कणेरी मठावर भरणार गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन; स्पर्धाही होणार; ६९ लाखांची बक्षिसे | पुढारी

कणेरी मठावर भरणार गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन; स्पर्धाही होणार; ६९ लाखांची बक्षिसे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : देशातील गाढवांचे पहिले प्रदर्शन कणेरी मठावर भरणार आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात हे अनोखे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात जनावाराच्या सौंदर्य स्पर्धाही होणार असून ६९ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्या वतीने ‘लोकोत्सवा’त २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे. मठावर गोशाळा आहे. येथे हजारावर गायी आहेत. नुकतीच भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू झाली आहे. या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने शेतकरी येणार आहेत. त्यामुळे देशी प्रजातींच्या जनावरांचे हे प्रदर्शन प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

तीन दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात गाय, म्हशी, बकरी, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचा सहभाग आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजारांचे बक्षीस दिले जाईल. देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहेत.

गाढव उपयुक्त प्राणी

गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे. मात्र तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यांच्याही स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Back to top button