पालघर : खरीवली गावात अघोरी प्रकार… निवडणुकीत उमेदवार पाडण्यासाठी जादूटोणा | पुढारी

पालघर : खरीवली गावात अघोरी प्रकार... निवडणुकीत उमेदवार पाडण्यासाठी जादूटोणा

वाडा;  पुढारी वृत्तसेवा :  निवडणुकीत विविध डावपेच आखून विरुद्ध पक्षाला चितपट करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मात्र तालुक्यातील खरीवली या गावांमध्ये चक्क जादूटोणा करून विरोधी पक्षाला धूळ चारण्याचा अघोरी प्रकार येथील ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे. वाडा पोलिसात या घटनेविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खरीवली (बिलावली) या गावामध्ये असलेल्या एका स्मशानभूमीत शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काही मांत्रिकांनी वर्तुळाकार रिंगण काढून त्यामध्ये अबीर, कुंकू भरून त्यावर टाचण्या, लिंबू, अंडी, काळ्या बाहुल्या, दोरे अशा वस्तूंचा वापर करून अघोरी कृत्य सुरू असताना गावातील तरुणांना याचा सुगावा लागला. तातडीने याबाबत पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने आरोपी फरार झाले असून याकृत्यातील साहित्य पोलिसांच्या हाती लागले
आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. या एकूण प्रकारामुळे ही निवडणुकीत चर्चेत आली आहे

दहा आरोपींविरोधात गुन्हा

निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांचे वशीकरण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा ठोस अंदाज असून
गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षांपूर्वीदेखील निवडणुकीच्या वेळी अशाच अघोरी प्रकारांचा वापर करण्यात आला होता. निवडणुकीत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा हा अतिशय घृणास्पद व अंधश्रध्देचा कळस गाठणारा प्रकार असून सर्वत्र याबाबत निंदा केली जात आहे. या घटनेतील दहा आरोपींविरोधात विविध
गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून वाडा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आपण एकविसाव्या शतकाच्या दिशेने वाटचाल करीत असतानाही निवडणुकीच्या रिंगणात जादूटोणा घेऊन उतरणे निंदनीय असून या घटनेचा कडक शब्दात आम्ही निषेध करीत आहोत. माझ्याविरोधात मागील वेळी असेच प्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र ही कुटनीती निषेधार्थ असून गावातील मतदार या घटनेने भयभीत झाले आहेत.
-गोविंद पाटील, स्थानिक सामजिक कार्यकर्ते 

Back to top button