पालघर : गणपती बाप्पांसह गौराईंना निरोप | पुढारी

पालघर : गणपती बाप्पांसह गौराईंना निरोप

वाडा; पुढारी वृत्तसेवा :  पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला सोमवारी भक्‍तीभावात निरोप देण्यात आला असून लाडक्या गौराईचे देखील विसर्जन यावेळी करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौराईला विशेष महत्त्व असून मूर्तीरूपासह जवळपास प्रत्येक घरात
कळलावीच्या झाडात वनस्पती रुपात गौराई अवतरते. जिचे विसर्जन भातशेतीत करण्याची परंपरा आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर, वाडा व विक्रमगड, वसईतील ग्रामीण भागात गौरी हा महत्त्वाचा सण मानला जातो. औषधी वनस्पतींचा एकत्र समूहात कळलावी या
आयुर्वेदिक झाडाच्या फुलात गौराई रूप धारण करते, अशी येथील भाविकांची भावना आहे. विधिवत पूर्जाअर्चा करून सोमवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पांसोबत गौराईचेही विसर्जन करण्यात आले.

सकाळपासून गौराईच्या विसर्जनाची तयारी सुरू होती. यासाठी विशेषत: महिला वर्गाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. तांदूळ व दही यांचे मिश्रण करून पानगुली हा पदार्थ प्रसाद अर्पण करण्याची परंपरा आहे. गौराईला
कपड्यात बांधून खांद्यावर घेऊन आपल्या भातशेती केलेल्या शेतात नेण्यात आले. शेतात भक्तिभावाने पूजा करून गौराईचे विसर्जन केले
व पुढल्या वर्षी लवकर येण्यासाठी गार्‍हाणेही घालण्यात आले. तसेच वसईतही श्रींगणेशासह गौरीचे पूजन करून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. गौरीला निरोप देताना महिलांनी स्वतः आपल्या डोक्यावर घेऊन दीड ते दोन किलोमीटरची पायपीट केली व गौराई मातेला विसर्जन करून निरोप दिला.

Back to top button