पालघर : उज्जैनी आरोग्य उपकेंद्राला लागले भरदिवसा टाळ | पुढारी

पालघर : उज्जैनी आरोग्य उपकेंद्राला लागले भरदिवसा टाळ

वाडा; मच्छिंद्र आगिवले :  वाडा तालुक्यातील पाचघर व मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी गावातील महिलांना प्रसूतीदरम्यान वेळेवर उपचार न मिळाल्याने उद्भवलेल्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला. पालघर जिल्हाधिकारी यांनी तातडीने पाचघर गावाला भेट देऊन येथील समस्यांची पाहणी केली. या घटना ताज्या असतानाच वाडा तालुक्यातील उज्जैनी या आरोग्य उपकेंद्राला चक्क दिवसा टाळे लागलेले पाहायला मिळाले. यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आदिवासी भागात एकीकडे रस्त्यांची समस्या बिकट असल्याने लोकांना मूलभूत सेवांसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. नुकताच
पालघर जिल्ह्यातील या घटनांनी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीला डाग लावल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी उज्जैनी गावातील आरोग्य
पथकाची पाहणी केली असता या पथकाला चक्क टाळे लटकलेले पाहायला मिळाले. उज्जैनी हे गाव दुर्गम असून आखाडा, विर्‍हे,
वडवली, उज्जैनी, घायपात पाडा अशी अनेक गावे त्या अंतर्गत येत असतात. पावसाच्या दिवसांत लोकांना अनेक लहानमोठे आजार उद्भवत असून सर्पदंश व विंचूदंश अशा अनेक घटना घडतात.

थातूरमातूर कारणे सांगून वास्तव लपविण्याचा प्रयत्न

उज्जैनी गावापासून परळी प्राथमिक आरोग्य केंद्र 14 किमी अंतरावर असून तालुक्याचे अखेरचे गावं आखाडा परळी पर्यंत 21 किमी अंतरावर आहे. त्यामुळे उज्जैनी येथेच लोकांना उपचार मिळणे गरजेचे असताना या आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावणे अतिशय
लाजिरवाणे आहे. मूळात या आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व परिचारिका थांबणे बंधनकारक असताना दुर्दैव म्हणजे तालुका वैद्यकीय अधिकारी बैठक व फिरती कामे अशी थातूरमातूर कारणे सांगून वास्तव लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालघर जिल्हाधिकारी यांनी पाचघर गावचा रस्ता तुडवून आदिवासी लोकांच्या समस्या येत्या काळात निवारण करणार असे आश्वासन दिले असताना उज्जैनी गावातील आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावण्याच्या या घटनेची दखल घेतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी विर्‍हे येथे भेटीला गेले असून परिचारिका परळी येथे मासिक अहवाल सादर करण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. गैरहजर जर कुणी असेल तर त्यांची विनावेतन गैरहजेरी लावली जाईल. उज्जैनी हे आरोग्यवर्धिनी केंद्र असून ते माता-बालक सेवा केंद्र आहे, आजारपण आहे त्याला काय करणार बैठका देखील महत्त्वाच्या आहेत.
– डॉ. संजय बुरपल्ले
तालुका आरोग्य अधिकार

Back to top button