पालघर : जिल्हाधिकार्‍यांची पाचघर वारी निष्फळ? ठोस आश्वासन न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी | पुढारी

पालघर : जिल्हाधिकार्‍यांची पाचघर वारी निष्फळ? ठोस आश्वासन न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी

वाडा; पुढारी वृत्तसेवा : वाडा तालुक्यातील पाचघर गावात अतिशय खराब रस्त्यामुळे प्रसूतीसाठी निघालेल्या महिलेची हेळसांड झाल्याची घटना स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍याच दिवशी घडली आहे. याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द होताच पाचघर गावातील मरणपंथाला गेलेल्या सेवांची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी भेट दिली मात्र ठोस आश्वासन न दिल्याने जिल्हाधिकार्‍यांची ही वारी निष्फळ ठरेल अशी लोकांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

पाचघर हे वाडा तालुक्यापासून 25 किमी अंतरावर असलेले दुर्गम गावं असून मुख्य रस्त्यापासून पाच किमी अंतराची बिकट वाट लोकांना तुडवून गावात जावे लागते. 16 ऑगस्टला गावातील एका महिलेला प्रसूतीसाठी नेताना चित्तथरारक असा तब्बल 80 किमी अंतराचा प्रवास करावा लागल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिध्द करताच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी गावांतील दूर्दशेची पाहणी केली. मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी सार्वजानिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला असूनही ग्रामस्थांना चिखलाची वाट तुडवत जावे लागते याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. गावात आरोग्य पथक आहे मात्र त्याची अवस्थाही नावापुरतीच असल्याने लोकांच्या नशिबी फरपट कायम असून आरोग्य विभागातील रीक्त पदांची अवस्था बिकट असल्याचे त्यांना विचारले असता हे खापर देखील राज्यातील एकूण व्यवस्थेवर फोडून रस्त्याच्या बिकट अवस्थेला वन विभागाच्या परवानग्या जबाबदार असल्याचे एक प्रकारे दर्शवून जिल्हाधिकार्‍यांच्या या भेटीतून काहीही सार्थकी लागणार नाही अशी टीका लोकांनी केली.

वर्तमान पत्रातील बातम्या पाहून या गावातील समस्या जाणून घेण्यासाठी आलो असून रस्त्याचा प्रश्न मुख्य समस्या असून वनविभागाची परवानगी कशी घ्यायची याबाबत येत्या काळात काम केले जाईल तसेच गावांतील समस्यांबाबत सबंधित विभागांमार्फत माहिती घेतली जाईल. वैद्यकीय अडचणींमुळे महिलेला ठाणे येथे जाण्याची वेळ आली असून आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचा आमचा प्रयत्न असेल.
– गोविंद बोडके,जिल्हाधिकारी, पालघर

Back to top button