वसई शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल | पुढारी

वसई शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल

नालासोपारा : पुढारी वृत्तसेवा :  वसई -विरार शहराची वाटचाल ही सध्या स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. महापालिका मल्टीपर्पज स्मार्टपोल उभारणार असून जाहिरात,सीसीटीव्ही एकाच स्मार्टपोलवर करणार असल्याने वसई विरारची आता स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. वसई विरार महापालिकेने च्या हद्दीत अनेक जण विनापरवाना जाहिरातबाजी करून शहर विद्रूप होत असून शहराला नवी झळाळी आणण्यासाठी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी कंबर कसली आहे. शहरात अनेक नवीन उपक्रम राबवत शहराची स्मार्टसिटी कडे वाटचाल कार्याला सुरवात केली आहे. शहराच्या विविध भागात सुमारे 300 स्मार्टपोल बसवणार असून त्याचे काम अंतिम टप्पात आहे. यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

वसई -विरार महानगर पालिकेने शहरात नव्याने दिव्याची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात केवळ दिव्याचे खांब उभे न करता या खांबाचा मल्टीपर्पज वापर करण्याचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ठरविले आहे.

काय आहे स्मार्टपोल योजना

वसई -विरार पालिकेने नुकतेच ठेकेदाराला याबाबत सूचना दिल्या आहेत. या पोलमध्ये इंटरनेट बूस्टर, अधिक प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल जाहिरातीचे फलक, दिशादर्शक फलक, आणि मोबाईल रेडीओचा सुद्धा वापर केला जाणार आहे. यामुळे स्मार्ट पोलचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. शहरातील अनेक भागात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने इंटरनेट बुस्टरमुळे नागरिकांना चांगली इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा मिळणार आहे.

शहरातील दिवे हे जुन्या पद्धतीचे असून त्यावर वीज अधिक वापरली जाते. यामुळे आता एलएडी दिवे लावले जाणार आहेत.यामुळे रस्त्यांवर अधिक लख्ख प्रकाश होईल.अधिक चांगल्या प्रतीचे नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमरे लावले गेल्यामुळे पोलिसांना गुन्हे तपासात मदत होईल. डिजिटल जाहिरातीमुळे पालिकेला उपन्न मिळणार आहे. मोबाईल रेडीओने संपर्क साधता येणार असून स्मार्टपोल नागरिकांना उपयोगी पडतील.

Back to top button