सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त | पुढारी

सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

डहाणू : पुढारी वृत्तसेवा :  डहाणू तालुक्यातील चिंचणी समुद्रकिनार्‍याजवळील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण महसूल विभागाने जमीनदोस्त केले आहे. निसर्गरम्य चिंचणी परीसरात समुद्र किनार्‍याजवळ सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहीली आहेत. त्याचप्रमाणे खाडी क्षेत्राजवळ झालेली अनधिकृत बांधकामे आणि अवैध भरावामुळे भरतीच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन पूरपरीस्थिती निर्माण होत आहे.

या अतिक्रमणाविरोधात आता डहाणू महसूल विभागाने तहसिलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली आहे. चिंचणी समुद्र किनार्‍याजवळील दांडेपाडा येथील सरकारी जागेवर यज्ञेश कमलाकर किणी आणि उज्ज्वल मोरेश्वर पाटील यांनी अतिक्रमण करून पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार महसूल विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर चिंचणीचे मंडळ अधिकारी गमजा तलाठी जाधव यांनी पाहणी व पंचनामा अहवाल सादर केल्यावर याप्रकरणी 7 वेळा सुनावणी घेण्यात आली होती.

या सुनावणीत अनधिकृत बांधकाम केलेल्यांना जागेची मालकी असल्याबाबत अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी 27 जूनपर्यंत यज्ञेश कमलाकर किणी आणि उज्ज्वल मोरेश्वर पाटील या दोघांनाही स्वत:हून अनधिकृत बांधकाम दूर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु तहसीलदारांनी दिलेला आदेश न पाळल्याने डहाणू महसूल विभागाने चिंचणीचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत दोन्ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली असून यामुळे चिंचणी समुद्रकिनार्‍याजवळील सरकारी जागेत तसेच सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकामे केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

समुद्रालगत अथवा इतर कोणत्याही ठिकाणच्या सरकारी जागेवर कोणी अवैधरीत्या बांधकाम केल्यास योग्य चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल.
– अभिजीत देशमुख, तहसीलदार डहाणू

Back to top button