पालघर जि.प. शाळांत पोषण आहार शिजेना | पुढारी

पालघर जि.प. शाळांत पोषण आहार शिजेना

डहाणू : विनायक पवार
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देणं बंद झाले आहे.सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नसल्यामुळे मध्यान्ह भोजन आहार बंदच झाला आहे. ग्रामीण भागामध्ये हाताला काम नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कोण करणार? असा प्रश्न स्थानिक आदिवासी समाजातील लोकांपुढे निर्माण झालेला आहे.

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी रोज मोठ्या आशेने खाली डबा घेऊन शाळेत जात आहेत. ग्रामीण भागातील पालक हे सकाळी उठून लवकर कामावर जात असल्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांसाठी जेवण शिजवून देण्यासाठी उपलब्ध असे धान्य नाही तर काही ठिकाणी काही पालकांना काम नसल्याने गरिबीमुळे विद्यार्थ्यांना खाली डबा घेऊन शिक्षणासाठी शाळेत जावे लागत आहे. मध्यान्ह भोजन आहार बंद झाल्यामुळे बर्‍यापैकी विद्यार्थ्यांना उपाशी राहून शिक्षण घ्यावे लागत आहे. काही शाळेत शिक्षकांनी बिस्कीट, केळी उपलब्ध केले आहे मात्र शिक्षकांना देखील या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा विषय आता गंभीर वाटू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या पालकांसह शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार लवकर सुरू करावा, असे मागणी सरकारकडे केली आहे.
शाळेतील पोषण आहार विद्यार्थी आवडीने घेतात. परंतु, अनेक महिन्यांपासून शाळेत पोषण आहार शिजविणे बंदच झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात बंदच झालेला पोषण आहार शाळा सुरू झाल्यानंतरही शिजविण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी आता पोषण आहाराची चव विसरले आहेत. शाळेत पोषण आहार केव्हा शिजणार? असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे. शाळेची पटसंख्या वाढीव व अत्यंत अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व मजुरांच्या मुलांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शालेय पोषण आहार सुरू करण्यात आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय पोषण आहारही बंद होता. काही दिवस विद्यार्थ्यांना कोरडा शिधा दिला जात होता. परंतु, आता तोही बंद आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही मुलांना शाळेतून पोषण आहार दिला जात नाही. त्यामुळे पटसंख्येवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. पोषण आहारामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते. शालेय पोषण आहारामुळे शरीराला आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी मदत होते. परंतु, शाळेत पोषण आहार शिजविणे अद्यापही बंद असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापासून मुलांना कोरडा शिधा वा शिजविलेला आहार दिला जात नाही. त्यामुळे कष्टकर्‍यांच्या मुलांवर मोठा परिणाम झाल्याचेच चित्र दिसत आहे. शाळा सुरू झाल्या परंतु अजूनही आम्हाला खिचडी शिजवून मिळत नाही. आठवड्यातून एकदा
बिस्किट मिळतात.
– रूपाली सुरेश बेंडगा
विद्यार्थिनी, जि. प. शाळा मुरबाड मुरबिपाडा

अंगणवाडीतील पोषण आहार शिजवून न देताना धान्य दिले जाते. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ना धान्य मिळते.. ना शिजविलेला आहार. – विनोद माळी, पालक

शालेय पोषण आहार ही केंद्र व राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना असून आदिवासी- गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना नियमितपणे सुरू राहणे खूप गरजेचे आहे. मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळालेला नाही. परंतु शाळेला तो प्राप्त होताच कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.
शाहू संभाजी भारती
प्राथमिक शिक्षक, पं. स. डहाणू

Back to top button