जव्हार, मोखाड्यात कुपोषित बालकांसाठी ‘सकस आहार’ उपक्रम | पुढारी

जव्हार, मोखाड्यात कुपोषित बालकांसाठी ‘सकस आहार’ उपक्रम

जव्हार : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांशी आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषण हा विषय नेहमीच चर्चेत असतो. येथील भागाला लागलेला कुपोषण हा कलंक नाहीसा व्हावा यासाठी जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. येथील कुपोषित बालके सुदृढ व्हावीत यासाठी सकस आहार म्हणून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी आयुषी सिंह आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मोरे यांच्या संकल्पनेतून नागली लाडू योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
या लाडू योजनेतून कुपोषित बालके सदृढ होण्यास नक्कीच फायदा होईल, या भागातील कुपोषण दूर होण्यास मदत होईल असे मत अधिकारी वर्गाने व्यक्त केले आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत व बालविकास विभाग यांच्यामार्फत आदिम जमातील कुपोषित बालकांना लाडू वाटप योजना राबविण्यात आली. हा नागली योजना राबवण्याच्या संकल्पनेतून आदिम जमाती संरक्षण आणि विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाड्यांना अर्थसहाय्य देणे या योजनेतून कुपोषित बालकांना लाडू वाटप करण्यात आले. कुपोषित बालकांसाठी लाडू योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

जव्हार पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या अंगणवाडी यामध्ये सॅम, मॅम, एस युडब्ल्यू, एम यु डब्ल्यू वर्गवारी मध्ये असणार्‍या आदिम कातकरी बालकांना जांभूळविहिर पूर्व, हिरडपाडा-बांबरेपाडा, देवतळी, कोगदा- कडव्याचीमाळी व न्याहाळे बिट- केळघर या अंगणवाडी केंद्रामधील बालकांना पौष्टिक नागलीचे नाचणीचे लाडू वाटप करण्यात आले.

जांभूळविहिर पूर्व येथे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयीन अधिक्षक, रोहिदास तावडे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक महेश वराडे, लिपिक टंकलेखक संजय कांगणे, बालविकास मुख्यसेविका आदिम जमाती कक्ष प्रकल्प समन्वयक सिताराम सवरा, ग्रामसाथी संदीप भोये, ग्रामसाथी प्रियांका वाघ, ग्रामसाथी अंकुश वड आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button