मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या प्रवीणकुमार सिंह (52) याने दोन वर्षात तब्बल 2 हजार 600 कोटी रुपये किमतीच्या 1 हजार 300 किलो ड्रग्जची विक्री करून त्यातून निव्वळ 20 कोटींचा नफा कमावल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच हे ड्रग्ज प्रवीणकुमारने पालघरमध्ये तयार केल्याचे उघड झाले आहे. याच माहितीच्या आधारे गुन्हे शाखा या टोळीच्या ड्रग्ज वितरणाच्या साखळीचा माग काढत आहे. सोबतच गुन्हे शाखेला टोळीतील आणखी एका मुख्य सूत्रधाराबाबत माहिती मिळाली असून त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मूळच्या उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या आरोपी प्रवीणकुमार सिंह याने पूर्वांचल विद्यापीठातून ऑरगॅनिक रसायनशास्त्रात एमएससीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे त्याने एमबीए केले. त्यानंतर 1997 साली तो मुंबईत आाला. नालासोपारा येथे कुटुंबासोबत राहात असलेल्या प्रवीणकुमार याने सुरुवातीला एका फार्मा कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी केली. त्यानंतर अन्य काही कंपन्यांमध्ये त्याने बड्या पदावर काम केले. अशा या सुमारे 15 वर्षांच्या अनुभवानंतर त्याने बंदी घातलेली औषधे विकण्यास सुरुवात केली. यामुळे त्याचा गुन्हेगारांशी संपर्क वाढला आणि त्याचा हा अवैध व्यवसाय वाढत गेला. 2018-19 मध्ये त्याने छोट्या पातळीवर एमडी विकण्यास सुरुवात केली.
प्रवीणकुमार याने पालघरमध्ये भाड्याने केमिकल युनिट विकत घेतले. तेथे त्याने थेट बॅचमध्ये एमडी तयार करण्यास सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा उपयोग आणि यूट्यूबवर व्हिडीओ बघून त्याने दर्जेदार एमडी बनवण्याची कला अवगत केली. प्रवीणकुमार याने जेव्हा एमडी बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने 200 किलोग्रॅम एमडी विकला. पुढे याची मर्यादा वाढवून त्याने 400 किलो आणि त्यानंतर त्याने थेट 700 किलोग्रॅम एमडी मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये विकला. याच पैशांतून त्याने उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मालमत्ता खरेदी केल्या असून गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करत आहे. अमली पदार्थ बनवून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विक्री करणार्या टोळीतील पाच आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 हजार 403 कोटी 48 लाख रुपये किमतीचे 701 किलो 740 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मात्र पोलिसांना ड्रग्ज विक्रीची ही साखळी मोठी असल्याचा संशय आहे.