

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जम्मू – काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (56) या भाविक महिलेचे बुधवारी (दि. 20) अमरनाथ यात्रेदरम्यान आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृतदेह विमानाने आणला जाणार आहे.
रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत दि.15 जुलै रोजी अमरनाथ यात्रेसाठी गेल्या होत्या. बुधवारी अमरनाथ दर्शनासाठी जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले होते. अमरनाथ डोंगरावर उंचावर असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागली होती. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती कवी रामचंद्र शिंदे, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ना. डॉ. भारती पवारांची मदत
रंजना शिंदे यांचे अमरनाथ येथे निधन झाल्याचे समजताच, त्यांचे दसक येथील नातेवाईक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबूराव आढाव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे निकटवर्तीय पदाधिकारी असलेले सरपंच विलास मत्सागर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने ना. डॉ. पवार यांना माहिती दिली. ना. डॉ. पवार यांनी अधिकार्यांना सूचना देत विमान उपलब्ध करून देण्यास मदत केली. गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरापर्यंत रंजना शिंदे यांचा मृतदेह विमानाने नाशिकला आणला जाणार आहे.