नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा

नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेच्या सभासद व त्यांच्या कुटुंबासाठी डॉ. वसंत पवार रुग्णालयात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र 50 बेड्सचा फ्लोअर उभारण्याचे आश्वासन प्रगती पॅनलच्या नेत्या नीलिमा पवार यांनी दिले.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडीत पार पडलेल्या प्रगती पॅनलच्या प्रचार मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद संपतराव देशमुख होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, भाऊसाहेब खातळे, बाळासाहेब जाधव, शिवाजी बस्ते, शंकरराव कोल्हे- खेडेकर, दिलीप मोरे, सुरेश कळमकर, सिंधू आढाव आदी उपस्थित होते. मविप्र संस्थेमार्फत जिल्हाभरातील सभासदांसाठी मोबाइल अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे सेवा पुरविण्याचादेखील मानस असल्याचे पवार यांनी सांगितले.

संस्थेने दिंडोरीत अडीचशे एकर जमीन खरेदी करून 85 कोटींची गुंतवणूक केली आहे. भविष्यात अद्ययावत कृषी महाविद्यालय हे तालुक्याची व संस्थेची ओळख ठरेल. संस्थेची प्रगती समजण्यासाठी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावण्याचे आवाहन पवार यांनी केले. कोरोनात 42 कोटींचा पगार दिला. जिल्हाभर उभारलेल्या आरोग्यसेवेची शासनाकडून दखल घेतली गेली. मात्र, विरोधक टीका करून त्या कार्याचा अवमान करीत असल्याचा आरोप डॉ. ढिकले यांनी केला. दरम्यान, दिवसभरात प्रगती पॅनलचे मोहाडी, कोराटे, दिंडोरी, वरखेडा, वणी, पाळे व कळवण आदी परिसरात प्रचार मेळावे झाले.

पॅनलच्या मागे ताकद उभारा : शेटे
यंदाच्या निवडणुकीत अर्धे इकडचे अर्धे तिकडचे न करता पूर्ण पॅनल निवडून अधिक चांगल्या कारभारासाठी पॅनलच्या मागे आपली मतदानरूपी ताकद उभी करावी. कर्मवीरांचा बहुजन शिक्षणाचा हेतू साध्य करण्यासाठी एकविचाराचे लोक निवडून देणे गरजेचे असल्याचे श्रीराम शेटे यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news