नाशिक : महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करणार- देवेंद्र फडणवीसांची संंमेलनात घोषणा

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठी भाषेतील 6 हजार धार्मिक ग्रंथांची निर्मिती झालेल्या श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारणीसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यभरातील महानुभाव पंथीयांची स्थळे अतिक्रमणमुक्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावरील श्री चक्रधरनगरी येथे आयोजित भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलनास मंगळवारी (दि. 30) ना. फडणवीस यांनी उपस्थिती लावली. व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, बिडकर बाबा, सुकेणेकर बाबा, साळकर बाबा, पुंजदेकर बाबा, विद्वांस बाबा, कारंजेकर बाबा, चिरडे बाबा, माजी महापौर सतीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भगवान चक्रधरस्वामी यांनी 800 वर्षांपूर्वी समाजात विषमता, कर्मकांड, अंधश्रद्धा व जातिभेद नष्ट करण्याचा संदेश देताना अहिंसेचा संदेश दिला. आज आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगतो. पण, मराठी अस्मिता व भाषेला थोरपणा देण्याचे महान कार्य चक्रधरस्वामी यांनी केले. तसेच त्यांनी समानतेचे बीज रोवल्याचे गौरवोद्गार ना. फडणवीस यांनी काढले.

लीळा चरित्र प्रकाशनाचा शासनाच्या वतीने विचार
परकीयांनी आक्रमणे करत महानुभाव पंथाचा विचार संपविण्याचा प्रयत्न केला. महानुभाव पंथाच्या स्थानांवर अतिक्रमणे केली. ही स्थाने अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. त्यासाठी लवकरच उच्चस्तरीय समिती गठीत करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले. शासनाकडून लीळा चरित्राचे प्रकाशन करण्याबाबतही विचार करण्याचे आश्वासन ना. फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news