नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. श्रावण महिन्यात विशेषत: तिसर्या श्रावणी सोमवारसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर येथे होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध स्थानकांतून जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. रविवार (दि. 14) पासून जुने सीबीएस बसस्थानकातून 230 जादा बसगाड्या उपलब्ध असणार आहेत.
श्रावण महिन्याच्या सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू असते. त्र्यंबकेश्वर येथे तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त फेरीसाठी भाविक दाखल होतात. ब—ह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारपासूनच भाविक त्र्यंबकेश्वर परीसरातून सुरुवात होते. भाविकांच्या सुविधेसाठी रविवारी (दि. 14) आणि सोमवारी (दि. 15) असे सलग दोन दिवस जादा बसगाड्या उपलब्ध असणार आहेत. जादा बसगाड्यांतून भाविक प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. दरम्यान, जुने सीबीएस येथून त्र्यंबकेश्वरसाठी बसगाड्या सुटणार असल्याने, या बसस्थानकावरील अन्य मार्गांसाठीच्या बसगाड्या महामार्ग बसस्थानकातून सुटणार आहेत.
त्र्यंबकेश्वर मार्गावर जादा बसेस धावणार आहे. जुने सीबीएस बसस्थानकातून भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बसेस सोडण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे.
-कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक