यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या सत्र व वार्षिक लेखी परीक्षांना सोमवार (दि.२९)पासून प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील विविध शहरांतील ६४३ केंद्रांवर परीक्षा होत असून, राज्यभरातून ५ लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलिस, सैनिक, गृहिणी, शिक्षक इत्यादी विविध घटकांतील आहेत. विविध १०९ शिक्षणक्रमांच्या विविध विषय मिळून तब्बल एकतीस लाखांहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन असून, पूर्वीप्रमाणेच विवरणात्मक पद्धतीने होत आहेत. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यास केंद्रांना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या. या परीक्षा १६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार राेखण्यासाठी केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. परीक्षेसाठी वरिष्ठ बःहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

प्रात्यक्षिक परीक्षा संपल्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना ८ मे पासून सुरुवात झाली होती. तब्बल वीस दिवस चाललेल्या या परीक्षा सुरळीत पार पडल्या. अंतर्गत गुण अभ्यासकेंद्रांना ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ९ जून २०२३ पर्यंत मुदत मिळणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news