पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेत त्याची रक्कम खात्यात वर्ग केल्याच्या कारणावरुन पाच ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बोफखेल ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्याच खात्यात वर्ग केली. त्यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्या कोर्टात बाई मगर, संजय बाबा वळवी, रामचंद्र नथु कुवर, दीपक सुक्राम पवार, विलास माल्या वळवी या ग्रामपंचायत सदस्यांविरुध्द प्रत्यक्ष हितसंबंध असल्याचे पुराव्यानिशी दर्शवून सदर सदस्यांच्या नावे धनादेश काढून रक्कम स्वतः च्या खात्यात वर्ग झाल्याचे पुरावे सादर केले. या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करावे असा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे सुनावणी झाली व कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या नावे ठेके घेऊन ग्रामपंचायत अधिनियमाच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हाधिकारी धुळे यांनी सदस्यांना अपात्र घोषित करत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे. तहसीलदार साक्री यांच्या मार्फत देण्याचे हे आदेश देण्यात आले आहेत.