भरधाव वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. परिचारिका या आपली ड्यूटी संपवून आपल्या दुचाकीने घरी जात होत्या तेव्हा वाळू डंपरने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक दुपारी वाळू डंपरने (क्र. एमएच.१९.वाय.७७७३) दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेरणा देविदास तायडे (वय-३२, रा.कंडारी, ता.भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचा चुराडा झाला आहे.
घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात इतका भयंकर होता की, दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. मयत प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका असून ड्युटी संपवून त्या घरी जात होत्या. नशिराबाद पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.