जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती दिली असली तरी जळगाव जिल्ह्यात अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल, अशी लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यात बाजार समितीच्या पॅनलमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशी युती पाहायला मिळत आहे.
धरणगाव तालुक्यात एकत्र प्रचार
जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपाठोपाठ आता बाजार समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजप-शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे. जिल्हा दूध संघात संजय पवार यांनी भाजपला मदत केल्याने दूध संघ आमदार एकनाथ खडसेंच्या ताब्यातून भाजपच्या ताब्यात गेला. याची परतफेड म्हणून जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने संजय पवारांना मदत करून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले. त्यामुळे येथेही राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. धरणगाव तालुक्यात हे तिन्ही पक्ष एकत्र प्रचार करीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पॅनलच्या बॅनरवर विरोधी पक्षनेते अजित पवारांचाही फोटो वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे प्रचार मेळावे घेत आहेत.