Nashik Zilla Parishad Election 2025 Date
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. याचा फटका हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची भिती सत्ताधारी महायुतीला वाटत आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबरअखेर घेतल्यास त्याचा तितकासा परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे या निवडणुका दुसऱ्या टप्यात म्हणजे डिसेंबर अखेर होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार व जिल्हा प्रशासनासबरोबर निवडणुक आयोगाने आढावा घेतला. यात पहिल्या टप्यात राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वात आधी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात शेतीची हानी झाली आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलीच झाल्यास त्याचा विपरीत परिणाम त्यावर, होऊ शकतो. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आदींना शेतकरी वर्गाची नाराजी परवडणारी नाही. शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती ही मदत मिळण्यास काहीसा विलंब लागत आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबरअखेर घेतल्यास त्याचा तेवढा परिणाम जाणवणार नाही, असे महायुतीचे गणित आहे.
जानेवारीअखेर निवडणुका पार पाडाव्या लागणार
प्रारंभी निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती. परंतु याचा फटका नको, यासाठी या निवडणुका हया डिसेंबर अखेरीस घेतल्या जातील. पहिल्या टप्यात, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील. अन अखेरच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे सांगितले जात आहे. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला आहे.