

नाशिक : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुख अधिका-यांनी ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष मुक्काम करून ग्रामपातळीवरील विकास कामांचा आढावा घेतला. या उपक्रमात सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते. प्रत्येक अधिका-यांने आपल्या पालक ग्रामपंचायतीत मुक्काम करून तेथील नागरिकांशी संवाद साधला.
ग्रामसभेत सहभागी होऊन नागरिकांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासली. गावातील शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, स्वच्छता व्यवस्था यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेऱ्या देखील काढण्यात आल्या. या उपक्रमामुळे अधिकारीवर्ग आणि ग्रामस्थ यांच्यात थेट संवाद निर्माण झाला असून, गावोगाव विकासाच्या नव्या संकल्पना राबविण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. ग्रामपंचायतींना प्रशासनाकडून थेट दिशा आणि पाठबळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आल्या. ओमकार पवार हे गाव मुक्कामी अधिका-यांवर वाॅच ठेवून होते. पवार यांनी जिल्हाभर दौरा करून भेटी दिल्या.