

नाशिक : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंचायत विकास निर्देशांक (पीएआय 1.0 आणि पीएआय 2.0) अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय अनिवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने 'शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030' जाहीर केला असून, शाश्वत विकासाच्या उद्देशाने जाहीर केलेली १७ शाश्वत विकास ध्येये व त्या अंतर्गत १६९ उद्दिष्टांचा समावेश असून, याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी या कार्यशाळेच्या उद्देशाबाबत माहिती दिली.
पंचायत विकास निर्देशांक प्रकल्पाचे राज्य प्रकल्प समन्वयक बाळनाथ बोराडे यांनी पंचायत प्रगती निर्देशांकाची नवीन आवृत्ती समजावून देण्याबरोबरच, पूर्वीच्या मधील मूल्यांकन प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे प्रशिक्षक विनोद अहिरे, शंकर माळोदे यांनी पंचायत मूल्यांकनातील नवीन साधनांची ओळख, पंचायत विकास निर्देशांकाशी संबंध, माहिती संकलन प्रपत्र प्रमाणीकरणाची कार्यपध्दती, बहुआयामी पंचायत मूल्यांकन प्रक्रियेचे सादरीकरण याबाबत माहिती आली.
या कार्यशाळेत 2025-26 या वर्षासाठीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संलग्न यंत्रणांमध्ये समन्वय, एकत्रित नियोजन आणि किमान संसाधनांच्या अधिकतम उपयोगावर विशेष भर देण्यात आला. तसेच तालुका स्तरावरदेखील याप्रमाणे कार्यशाळा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
कार्यशाळेस उपवनसंरक्षक (पूर्व) पी.एस. अहिरे, उपसंचालक (सांख्यिकी) एम. एम. शेवतकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, कार्यकारी अभियंता पी. डी. मेतकर, पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, उपअभियंता ए. एम. सूर्यवंशी, रमेश शेळके, डॉ. राजेंद्र बागूल आदी उपस्थित होते.