नाशिक : जिल्हा परिषदेच्या निघालेल्या गट आरक्षणात जिल्ह्यातील अनेक दिग्गाजांचे मिनी मंत्रालयात येण्याचे स्वप्न भंगले आहे तर, दुसरीकडे गट खुले झाल्याने अनेक माजी पदाधिकारी, सदस्यांना जिल्हा परिषदेची कवाडे खुली झाली आहेत. काही इच्छुकांनी अन्य गटाची शोधाशोध सुरू केली आहे तर, काहींनी कुटुंबियातील महिला किंवा अन्य सदस्यांना उतरविण्याची तयारी केली आहे.
जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या निफाड तालुक्यातून माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, सिध्दार्थ वनारसे, गोकुळ गिते, दीपक शिरसाठ, जयदत्त होळकर, सानिया होळकर, खंडू बोडके, डॉ. डेरले, संदीप गडाख, शिवा सुरासे, केशव जाधव यांना यांचे गट महिला व इतर प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली आहे. ही संधी हुकल्याने बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पत्नी मुक्ताताई क्षीरसागर, गोकुळ गिते यांची पत्नी उज्वला गिते, सिध्दार्थ वनारसे यांच्या पत्नी संगीता वनारसे, गौरव पानगव्हाणे यांच्या पत्नी डाॅ. धनश्री पानगव्हाणे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सिन्नर : तालुक्यातील सहा गटांपैकी दोन गट महिलांसाठी तर चार गट खुले झाले आहे. त्यामुळे येथून भारत कोकाटे, सीमंतिनी कोकाटे यांचा मार्ग मोकळा झाला असून उदय सांगळे यांचा दापूर गट मात्र महिला राखीव झाल्याने त्यांची संधी पुन्हा हुकली आहे. त्यामुळे माजी अध्यक्षा शीतल सांगळे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. खुले आणि ओबीसी गट झाल्याने कोंडाजीमामा आव्हाड यांचे पुतणे शशीकांत आव्हाड हे देखील नशीब अजमावू शकतात. माजी सभापती बाळासाहेब वाघ, नीलेश केदार, राजेश गडाख देखील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
चांदवड : तालुक्यातून तळेगावरोही गट महिलांसाठी राखीव झाल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल, गणेश निंबाळकर यांची संधी हुकली आहे. गट महिलांसाठी राखीव झाल्याने डाॅ. कुंभार्डे यांच्या पत्नी डाॅ. शिल्पा कुंभार्डे या रिंगणात उतरू शकतात. वडाळीभोई गट ओबीसींसाठी खुला झाल्याने येथून माजी सदस्य कारभारी आहेर, सभापती नितीन आहेर यांना संधी मिळू शकते. दुगाव गट एससी राखीव झाल्याने माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड तसेच वडनेरभैरव गट एसटीसाठी राखीव झाल्याने भालेराव कुटुंबीय बाळासाहेब माळी यांना पाच वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दिंडोरी : तालुक्यातील सर्व गट एसटीसाठी राखीव झाल्याने येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, विलास कड, शाम बोडके, मविप्र संचालक प्रविण जाधव, माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राजाभाऊ ढगे यांची अडचण झाली आहे तर, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी सभापती सुनीता चारोस्कर, धनराज महाले, वैभव महाले तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांना जिल्हा परिषदेतची पायरी चढण्याची संधी मिळणार आहे.
येवला : तालुक्यात सर्वसाधारण तीन, ओबीसी एक तर एक जागा एससी राखीव झाली आहे. त्यामुळे पाटोदा गटातून माजी सभापती संजय बनकर, बाळासाहेब पिंपळकर तर नगरसुल गटातून पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, अंदरसूल गटातून मकरंद सोनवणे, महेंद्रकुमार काले, बाबा डमाळे, मुखेड गटातून माजी सदस्य बाळासाहेब गुंड, सचिन आहेर यांना संधी मिळू शकते. माजी सभापती सुरेखा दराडे यांच्या बरोबर दराडे कुटुंबीयांची मात्र संधी राखीव गटाने रोखली गेली आहे. कुणाल दराडे यांना नवीन गट शोधावा लागणार आहे.
देवळा : तालुक्यातील तीन गट सर्वसाधारणसाठी खुले झाल्याने येथून माजी सभापती केदा आहेर त्यांच्या पत्नी माजी सदस्या धनश्री आहेर, सुनील आहेर, माजी सदस्या नूतन आहेर यांना संधी मिळू शकते. माजी सदस्य प्रशांत देवरे, मंत्री दादा भुसे यांचे भाचे अंकुश देवरे हे उमराणे गटातून आपले नशीब अजमावू शकतात.
नाशिक : तालुक्यातून चार पैकी तीन गट हे राखीव झाले असून पळसे हा एकमेव गट ओबीसींसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या गटातून अनेक दिग्गज उतरू शकतात. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी सदस्य संजय तुंगार या गटातून रिंगणात उतरू शकतात. गिरणारे गटातून आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, माजी सभापती रत्नाकर चुंभळे यांची मात्र अडचण झाली आहे.
बागलाण : तालुक्यातील सहा गटांपैकी तीन गट एसटी, दोन गट ओबीसी तर एक गट खुला झाला आहे. येथून माजी सदस्य यशवंत पाटील यांना ठेंगोडा नामपूरमधून गुलाबराव कापडणीस तर ब्राह्मणगाव गटातून वर्षा पप्पू बच्छाव, लता बच्छाव यांना संधी मिळू शकते. नामपूर गट सर्वसाधारण महिला झाल्याने यतिंद्र पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जायखेडा ओबीसी झाल्याने यतिंद्र पाटील या गटातून नशीब अजमाविण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तिन्ही गट एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे येथून बाजार समितीचे माजी उपसभापती विनायक माळेकर, माजी सदस्या रूपाजंली माळेकर यांना संधी मिळणार आहे. माजी उपाध्यक्षा नयना गावित, रवींद्र भोये, भारती भोये, काशीनाथ टेहरेही रिंगणात उतरू शकतात. गट राखीव झाल्याचा फटका माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे यंदाही जिल्हा परिषदेची दरवाजे बंद झाले आहे.
मालेगाव : तालुक्यातून झोडगे गटातून देसले, खाकुर्डी गटातून ठाकरे घराणे, रावळगाव गटातून माजी सभापती अलका आखाडे, निमगाव गटातून माजी अध्यक्ष मधुकर हिरे, जे. डी. हिरे, कळवाडी गटातून माजी सदस्या बलवीर कौल गिल, सौंदाणे गटातून माजी सभापती मनीषा पवार, दाभाडी गटातून निकम कुटुंबीय रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
नांदगाव : तालुक्यातील सर्व गट सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे. साकोरा गटातून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे, न्यायडोंगरी गटातून दर्शन आहेर उमेदवार राहू शकतात. भालूर गटातून माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधू माजी सदस्य राजेंद्र पवार यापैकी एक उमेदवार असू शकतात. युवा नेते तेज कवडे यांचा गट महिला राखीव झाल्याने त्यांच्या कुटुंबियातील महिला सदस्य रिंगणात उतरू शकतात.
कळवण : तालुक्यातील चारही गट एसटी महिला राखीव झाले आहे. त्यामुळे इथून माजी अध्यक्षा जयश्री पवार, गीतांजली गोळे-पवार या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे. रवींद्र देवरे, शैलेश पवार, भूषण पगार यांची मात्र, अडचण झाली आहे.
इगतपुरी : तालुक्यातील घोटी बुद्रुक हा एकमेव गट खुल्या प्रवर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे या गटातून माजी सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, निवृत्ती जाधव, संदीप गुळवे हे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्यानेच निर्माण झालेल्या खंबाळे गटातून माजी सदस्य कावजी ठाकरे यांना मात्र कुटुंबातून महिलेला उतरावे लागेल. जनार्दन माळी यांना मात्र घरातील महिलेला रिंगणात उतरवावे लागणार आहे. ज्ञानेश्वर लहाणे, संदीप वाजे, सुनील वाजे यांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पेठ : तालुक्यातून माजी सदस्य भास्कर गावित व त्यांचे पुत्र शाम गावित यांच्या कुटुंबा भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत असल्यामुळे येथे गावित कुटुंबातीलच उमेदवार राहणार आहे. दुसऱ्या गटातून गावित कुटुंब कोणाला संधी देते याकडे लक्ष लागले आहे.
सुरगाणा : तालुक्यातील चार पैकी तीन गट हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे एकमेव एसटी पुरूष गट झालेल्या हतगड मध्ये इच्छूकांची भाऊगर्दी होऊ शकते. माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजीत गावित, चिंतामण गावित, माजी सभापती मंदाकिनी भोये, समीर चव्हाण, एन. डी. गावित हे तालुक्यातील गटांमधून उमेदवार करू शकतात.