

नाशिक : जिल्हा परिषदेतील बदल्यांविरोधात कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी नियुक्त केलेल्या समितीने गुरूवारी (दि.29) जिल्हा परिषदेत सहा तास बदल्यांची माहिती घेतली.
विभागीयनिहाय माहिती घेतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी समितीकडे लेखी तक्रारी केल्या. दरम्यान, समितीकडून शुक्रवारी (दि.30) अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाखल अहवालावर डॉ गेडाम नेमका काय निर्णय घेतात, याकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्यांत दहा टक्के प्रशासकिय करण्याचा शासन आदेश असताना अनेक निकष डावलण्यात आले. या अनियमित बदल्यांविरोधात ग्रामसेवक संघटनेने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच विभागीय आयुक्त गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारांची देखल घेत गेडाम यांनी चौकशी समितीची नियुक्त करत अहवाल मागविला. समितीने गुरूवारी सकाळी जिल्हा परिषदेत येत दिवसभर तळ ठोकला. संपुर्ण माहिती घेतल्यानंतर दुपारी साडेचारला रवाना झाली.
कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.29) पुन्हा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांची भेट घेतली. समितीकडून बदल्यांबाबत निर्णय होईपर्यंत बदली झालेल्या कर्मचा-यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी संघटनांनी केली.
समितीने प्रत्येक विभागाकडून बदल्यांबाबत कागदपत्र जमा केली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहोत. त्यावर तेच निर्णय घेतील.
सारीका बारी, सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक