

कळवण : उमेश सोनवणे
जिल्हा परिषदेची गण- गट रचना जाहीर झाल्यानंतर कळवण तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४ गट, तर पंचायत समितीसाठी ८ गण निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेची यंदाही गट व गणांची रचना पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे. मागील निवडणुकीत वाढीव गट- गणांमुळे प्रस्थापित उमेदवारांबरोबरच नवोदित इच्छुकांमध्ये उत्साह दिसत आहे. यंदा तालुक्यातील अनेक राजकीय घराण्यांचे वारसदार पुढे येताना दिसत आहेत. अनेक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्या मुलांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
तालुक्याच्या राजकारणात पवार कुटुंबाचा दबदबा गेली अनेक दशके कायम आहे. माजी मंत्री (स्व.) ए. टी. पवार यांनी तब्बल चार दशके तालुक्याचे नेतृत्व केले. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात जिल्हा परिषदेपासून झाली होती. काही काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर त्यांचे पुत्र आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनीही दोन कार्यकाळ जि.प.मध्ये यशस्वी काम केले आहे. जयश्री पवार यांनीही जि.प. अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
आता पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. आमदार नितीन पवार यांचे चिरंजीव हृषिकेश पवार हे सध्या ए. टी. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. आगामी जि.प. निवडणुकीत ते उमेदवारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या बाजूला कळवण नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष कौतिक पगार यांचे चिरंजीव भूषण पगार हे येत्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. कौतिक पगार हे कळवण शहराचे माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी उपसभापती, मजूर संघाचे माजी उपाध्यक्ष असून, सध्या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे भूषण पगार यांना घरातूनच राजकीय बाळकडू लाभलेले आहे.
सध्या भूषण पगार कळवण एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस आहेत तसेच कळवण तालुका शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून उत्तर महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांचे शिवस्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारक उद्घाटनासाठी त्यांनी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रित करून आपल्या प्रभावी राजकीय कार्यक्षमतेची झलक दाखवली आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले जाणार, हे निश्चित.
पुनदनगर (मागील खर्डेदिगर) : पुनदनगर - मोकभणगी
मानूर : मानूर - निवाणे
कनाशी : कनाशी - बापखेडा
अभोणा : अभोणा - नरूळ
२०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यसंख्या वाढवून कळवण तालुक्यात १ नवीन जिल्हा परिषद गट व १ पंचायत समिती गणाची भर घातली होती. मात्र, सध्याच्या निर्णयानुसार 'जैसे थे' धोरण स्वीकारत गट- गण रचना यथास्थित ठेवण्यात आली असून, केवळ एका गटाचे नाव बदलण्यात आले आहे.