नाशिक : जिल्हा परिषदेचे 74 गट आणि पंचायत समितीच्या 148 गणांसाठी 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर प्राप्त झालेल्या 48 हरकती फेटाळण्यात आल्या आहे. सर्व हरकती फेटाळल्यानंतर प्रसिध्द केलेला प्रारूप आरक्षण सोडत ही अंतिम करण्यात आली आहे. याबाबतचे अंतिम आरक्षण राजपत्रात सोमवारी (दि.3) प्रसिध्द करण्यात आले. आता गट, गण आरक्षण अंतिम झाल्याने निवडणुकांची प्रतिक्षा इच्छुकांना लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या 74 गटांच्या आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला काढण्यात आली होती. या आरक्षणाबाबत हरकती घेण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. परंतु जिल्हा परिषदेच्या आरक्षणाबाबत 41 व पंचायत समितीच्या गणांसाठी अशा सात हरकती दाखल झाल्या होत्या. यात जाहीर झालेल्या गट आरक्षणांने अन्याय झाल्याने फेरआरक्षण करावे, काही तालुक्यातील ठराविक गटांवर हरकती प्राप्त होत्या. या हरकतींचा गोषवरा अभिप्रायासह जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सादर केला. प्राप्त झालेल्या हरकती 31 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त यांनी निकाली काढल्या. यात प्राप्त झालेल्या सर्व 48 हरकती हया फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरक्षण अंतिम करत ते राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे.
अंतिम मतदार याद्या प्रसिध्द
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गत महिन्यात मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात, राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिध्द करून, त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल कराव्यात. त्यानंतर अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर करावी असे निर्देश होते. परंतू, गत आठवडयात राज्य निवडणुक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमुर्ती यांनी पत्र काढत, अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यास सात दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार सोमवारी (दि.3) अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुकापतळीवर तहसील कार्यालयावर या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. 12 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द होतील.