

Investigation properties former Vasai-Virar Municipal Corporation Commissioner Anil Kumar Pawar second day
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नाशिकमधील मालमत्तांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्याने पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पवार यांच्या नाशिकमधील निवासस्थानातून ईडीने तब्बल एक कोटी २० लाखांची रोकड जप्त केली असून, मालमत्तांशी निगडित कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. ईडी पथकाने नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरासह सटाण्यातील मालमत्तांची चौकशी केली असून, पवार यांच्या जिल्ह्यातील नातेवाइकांच्या मालमत्तांचीही झाडाझडती केल्याची माहिती समोर येत आहे.
मंगळवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास ईडीने राज्यातील १२ ठिकाणी छापेमारी केली. त्यात वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त पवार यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. ईडीचे पथक वसई, दीनदयाळनगर येथील पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर पोहोचल्यानंतर, पथकाने त्यांची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतले होते. या दोघींसह पथक मंगळवारीच गंगापूर रोड, पाइपलाइन रोड येथील पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.
या ठिकाणी झाडाझडती करीत एक कोटी २० लाखांची रोकड जप्त केली. तसेच मालमत्तांशी निगिडत कागदपत्रेही ताब्यात घेतली. पवार यांच्या नावे नाशिकसह पाथर्डी फाटा, सटाणा, बागलाण या ठिकाणी मालमत्ता असल्याने, ईडीने प्रत्यक्ष मालमत्तास्थळी धडक देत चौकशी केली. पाथर्डी परिसरातील पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या ४१ ३.२५ चौ. मीटरच्या बिगरशेती भूखंडाची पाहणी केली. हा भूखंड त्यांचा पुतण्या तुषार विजय पवार याच्या नावे असून, त्याने आजी निर्मलाबाई पवार यांना भेट दिला. नंतर त्यांच्या इच्छेनुसार अनिलकुमार पवार यांना दिल्याची नोंद आहे.
या शिवाय बागलाण तालुक्यातील सटाण्याजवळील खामताणे गाव येथे ०.४१ व ०.४५ हेक्टर जमिनीवर सुमारे चारशे चौरस फुटांच्या फार्म हाउसची पाहणी केली. बागलाण तालुक्यातील आराई गावात त्यांच्या नावे असलेल्या तिन्ही भूखंडांचीही पाहणी केली. याशिवाय सटाणा येथे असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्येही ईडीने धडक देत काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नातेवाइकांच्या मालमत्ताही ईडीच्या रडारवर असून, तिसऱ्या दिवशीही ईडीकडून नाशिक शहर व ग्रामीणमध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आयुक्त पवार यांच्या ईडी कारवाईवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, अनिलकुमार पवार हे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत. ईडीचे धागेदोरे आता दादा भुसे यांच्यापर्यंत जाऊ शकतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसे यांनी अनिल पवारसाठी आग्रह केला होता. पुढे पवार यांना आयएएस दर्जा मिळण्यापूर्वीच दादा भुसे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तपदी बढती दिल्याचा दावा राऊत यांनी केल्याने, पवार यांच्या ईडी कारवाईवरून पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.