

ठळक मुद्दे
नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी 'पोषणदूत' उपक्रमास चांगला प्रतिसाद
१३६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत परावर्तित झाली आहे
योजनेत प्रत्येक अधिकाऱ्यास एका बालकास दत्तक घेऊन आरोग्य, पोषण, स्वच्छतेचा पाठपुरावा
नाशिक : जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'पोषणदूत' या नावीन्यपूर्ण उपक्रमास दोन महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उपक्रम सुरू करताना जिल्ह्यात ३४५ कुपोषित बालके होती. यातील ९७ बालके कुपोषणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले. १३६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत परावर्तित झाली आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागातील तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीतून ही आकडेवारी समोर आली. पवार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने १५ ऑगस्टपासून 'पोषणदूत योजना' या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला होता.
या योजनेंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील वर्ग १ व वर्ग २ अधिकारी 'पोषणदूत' बनून अतितीव्र कुपोषित बालकांना दत्तक घेत बालकांच्या पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांना 'नॉर्मल' श्रेणीत आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. योजनेत प्रत्येक अधिकाऱ्यास एका बालकास दत्तक घेऊन त्याच्या आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत आहे. प्रमाणित कार्यप्रणालीनुसार दरमहा अतितीव्र कुपोषित बालकांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. या उपक्रमाला दोन महिने पूर्ण झाले असून, उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील २३४ अतितीव्र कुपोषित बालकांपैकी ९७ बालके नॉर्मल श्रेणीत परिवर्तित झाली. १३६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत आली. योजनेचे हे मोठे यश असून, त्यांनी सर्व पालक अधिकाऱ्यांचे कौतुक केले. उर्वरित ११२ अतितीव्र कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष पुरवण्याचे आदेश पवार यांनी दिले. उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे आवाहन केले. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल उपस्थित होते.