

येवला : संतोष घोडेराव
बुद्धपौर्णिमा ही सर्वाधिक प्रकाशमान रात्र आणि उन्हामुळे पाणवठ्यावर मोठ्या संख्येने प्राणी येत असल्याने तालुक्यातील राजापूर-ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात वन विभागाने ठिकठिकाणी कॅमेरा व पाणवठ्यांवर सीसीटीव्ही लावत वन्यजीवांची गणना केली. ट्रॅप कॅमेरे लावत वन्यजीवांचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.
वनहद्दीत लावलेला लाइव्ह कॅमेरा, ट्रॅप कॅमेऱ्याने हरणांसह तरस, लांडगे, मोर, नीलगायीसह अनेक प्राणी व विविध पक्षी टिपले आहेत. तालुक्यातील राजापूर, ममदापूसह पूर्व भागातील वनहद्दीतील संपूर्ण जंगलात वन्यप्राण्यांचा वावर वाढताना दिसत आहे. या भागात वनविभागाचे साडेसात हजार हेक्टर वनक्षेत्र असून, यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर वनसंवर्धन राखीव प्रकल्प राबवण्यात आला आहे.
अतिशय कडक उन्हामुळे पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती सुरू आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वनातील पाणवठ्यावर कॅमेरे पाठवठे, गवताचे कुरण काही प्रमाणात हरणांची सोय होत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरणाचे स्थलांतर थांबले आहे. ममदापूर, राजापूर, सोमठाण जोश, देवदरी, खरवंडी, भुलेगाव, राहडी, पिंपळखुटे बु. पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, कुसमाडी या राखीव बसवण्यात आले.
पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांची गणना करण्यात आली. यात तरस, लांडगे, काळवीट, खोकड, मोर, मुंगूस इतर वन्यजीवांची नोंद घेण्यात आली. यावरून फक्त हरणच नव्हे तर इतरही वन्यप्राणी या जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माळी, वनरक्षक गोपाल राठोड, गोपाल हरगावकर, पंकज नागपुरे, वनसेवक विलास बागूल, आप्पा वाघ, मच्छिंद्र ठाकरे, दादा मोहन, सोमनाथ ठाकरे, मच्छिंद्र आरखडे या वन कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
२०१६ मध्ये राजापूर परिक्षेत्रात २९७ काळवीट, ६७५ हरणे, ७० पाडस असे एकूण १०४२ पशू आढळले होते. २०१८ मध्ये यात ३७८ ने वाढ झाली. त्यात ६० काळवीट, २२८ हरणे, तर ९० पाडस अशी वाढ होत संख्या १४२० झाल्याचे आढळले होते. तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांत असलेला वावर पाहता ही संख्या पाच ते सात हजारांच्या दरम्यान असल्याचाही अंदाज आहे.