

येवला : संतोष घोडेराव
मस्तानीची आठवण करून देणारी... राजेरजवाड्यांतील ऐतिहासिक रंगबाजीतील ओठांवरून निथळणारी ती लाली... 'डॉन' चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले गीत 'खईके पान बनारसवाला...' हे ओठांवर येताच आठवतो तो रिकाम्या हातांना रोजगार देणारा पान स्टॉलचा व्यवसाय. गुटख्याच्या साम्राज्यात आजही या पानांची लाली कायम टिकून आहे, ह विशेष... धार्मिक विधीची सुरुवात नागवेलीच्या पानानेच होते.
अतिशय गुणकारी आणि उपयुक्त असलेल्या नागवेलीच्या पानामुळे रस्त्यालगत, गावांतर्गत विविध ठिकाणी व चौकाचौकांत पान दुकान उभारून कित्येक बेरोजगारांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळाला असून, आज कित्येक बेरोजगार युवक पान दुकानाच्या रूपाने आपल्या कुटुंबाचा आधारवड झाले आहे.
गुटखाबंदी असतानाही सर्रास गुटखा विक्री होत असल्यामुळे गावोगावी पानटपऱ्या नव्हे, तर गुटखा टपऱ्या दिसू लागल्या आहेत. मात्र पान दुकानांवर अजूनही पानांची क्रेझ कायम आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे येवला तालुक्यातील थिएटर रोडवरील बिलाल पान दुकान होय. अजूनही नव्या पिढीत तरुणांसह ३० ते ४० वयोगटाची पान खाण्यासाठी गर्दी असते.
रात्री भोजनानंतर हमखास फेरफटका मारण्यानिमित्त पान खाल्ल्यामुळे अन्नपचन व रक्तवाढीला फायदा होतो म्हणून पानाचा व्यवसाय आज कमी झालेला नाही. विशेष म्हणजे मारवाडी, गुजराती, भय्या आणि मुस्लीम समाजात पानाचे महत्त्व अजूनही टिकून आहे. अशी आहे नागवेलीच्या पानांची बाजारपेठ वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे नागवेलीचे पानमळे आहेत.
पानाचे मोठे उत्पादन होत नसले, तरी चांदवड आणि इतर भागांतील बाजारपेठ टिकून आहे. शुक्रवारी श्रीरामपूर, तर रविवारी चांदवड या दोन्ही ठिकाणी नागवेलीच्या पानांचा मुख्य बाजार भरतो. या दोन्ही ठिकाणी ठरलेल्या दिवशी तब्बल ५० लाखांहून अधिक पाने विक्रीसाठी येत असल्याने पूर्ण राज्यातच नव्हे, तर राजकोट तसेच बिहार सारख्या विविध राज्यांतून व्यापारी नागवेलीचे पान खरेदीसाठी येतात.
लहान पेटारे चार ते सहा हजार, मोठे पेटारे साडेसात ते नऊ हजारांपर्यंत दहा हजारांप्रमाणे नागवेलीच्या पानांचे सुरक्षित पॅकिंग केले जाते. ५० पैसे ते एक दोन रुपयापर्यंत प्रतिपानाला मालाच्या आवकेनुसार भाव मिळतो. विशेष म्हणजे नागवेलीच्या पानाबरोबर बनारस, कोलकाता, देशी, मघई, जगन्नाथपुरी यांसारखी विविध पानेही पान दुकानांतून विकली जातात. रेल्वेने आलेल्या कोलकाता आणि बनारस पानांचा मोठा बाजार मुंबई येथील महंमद अली रोड नळ बाजार येथे भरतो.
कोलकाता पानाला ३०० पानांच्या डोलीला ३०० ते ५०० रुपये, तर मगई पानाच्या डोलीस साडेचारशे ते ५०० रुपयांपर्यंत भाव आहे. बनारस पानाला २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळत असल्याने तेथील मेन डीलरच्या माध्यमातून डोलीच्या रूपाने प्रत्येक जिल्ह्याला मागणीनुसार सबडीलरच्या माध्यमातून वितरित करून तालुकानिहाय गावोगावी पान दुकानापर्यंत पाने मागणीनुसार पोहोच केली जातात. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यालाही पान दुकानदारांना गरजेनुसार ऑर्डर मिळू लागल्यामुळे लग्नसराईमध्ये हक्काचा रोजगार मिळत आहे
मिठा मसाला पान खाल्ले, तर अन्नपचन आणि रक्तवाढीसाठी चांगले असते. साखरपुडा, लग्नसमारंभआणि वाढदिवसालाही मागणीप्रमाणे पानांची ऑर्डर दिली जाते. खासकरून शिर्डीला नेहमी जास्त पानांची ऑर्डर असते
-बिलाल अन्सारी, पान दुकानदार, येवला