

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने मका खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या ६६,००० मेट्रिक टनांच्या खरेदी मर्यादेत आणखी ५०,००० मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण खरेदी मर्यादा १ लाख १६ हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे.
मका दरातील चढ-उतार आणि बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून खरेदीची मुदत वाढविण्याची तसेच खरेदी मर्यादा वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यासह राज्यातील मका उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल खासदार भास्कर भगरे यांनी समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, खरेदी केंद्रांवर वाढीव मर्यादेनुसार मका स्वीकारला जाणार असून, पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून लाभघ्यावा, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.