

येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पारेगावलगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदाराला मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. २०) दुपारी घडली. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात राहुल बद्रिनाथ आहेर व शुभम परदेशी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी नायब तहसीलदार पंकज कृष्णराव नेवसे यांना तहसीलदार आबा महाजन यांनी पारेगाव येथील तळ्यात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले व वैभव भड यांच्यासह घटनास्थळी गेले होते.
तेथे एमएच-१७ सीव्ही-४५२२ क्रमांकाचा डंपर मुरुमाने भरलेला आढळला होता. यावेळी उपस्थित राहुल आहेर व शुभम परदेशी यांच्याकडे उत्खननासंदर्भातील परवान्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उलट दोघांनी महसूल पथकाशी अरेरावीची भाषा करीत वाद घातल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार राहुल आहेरने नायब तहसीलदार नेवसे यांना मारहाण करून खाली पाडले तसेच गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नेवसे यांना दुखापत झाली. तसेच दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश घोरपडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीतही संबंधितांकडून शिवीगाळ सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.