

नाशिक : राज्यस्तरीय "यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४" अंतर्गत विभागस्तरावरील उत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषद नाशिकला विभागीय प्रथम क्रमांकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मंगळवारी (दि. 27) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कळवण पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियान सन 2023-24 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक महसुली विभागात तृतीय क्रमांक मिळवला. ग्रामविकासमंत्री गोरे यांच्या हस्ते तत्कालीन गटविकास अधिकारी नीलेश पाटील, गटविकास अधिकारी रमेश वाघ व सहायक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प.ला सभा कामकाज, कर्मचारी व्यवस्थापन, तक्रार निवारण, सेवाहमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, भरती प्रक्रिया, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा, अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बालकांचे लसीकरण तसेच भौतिक विकासाची कामे या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण प्रशासनात पारदर्शकता, गतिशीलता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात आला. जि. प.ने या सर्व निकषांवर प्रभावी अंमलबजावणी करत विभागीय स्तरावर आघाडी घेतली.
प्रशासनातील डिजिटायझेशन, ई-ऑफिसचा प्रभावी वापर, ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले असून, या यशात सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारीवर्गाचे योगदान मोलाचे आहे. भविष्यातही जि. प. प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर उत्कृष्ट कार्याच्या दिशेने पुढे जाण्यास कटिबद्ध आहे.
प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
सन 2022-23 : सचिन पवार (ग्रामपंचायत अधिकारी, दरी ता. नाशिक),
भालचंद्र तरवारे (ग्रामपंचायत अधिकारी, बेहेड, ता. निफाड)
सन 2023 - 24 ः डॉ. भगवान ताडगे (सहायक पशुधन अधिकारी, गिरणारे, नाशिक पंचायत समिती), सुनील ठाकरे (कनिष्ठ सहायक, पंचायत समिती, चांदवड)