

नाशिक : युवा पिढी केवळ समाजमाध्यमे, गॅझेटसमध्ये अडकली आहे. समाजासाठी काही करण्याची त्यांच्यातील प्रेरणाच हरवली, युवा वर्ग स्वकेंद्री भौतिकवादी झालाये, अशी दूषिणे नेहमीच ऐकायला येतात. हे आरोप चुकीचे ठरवत कमी वयात समाजाेपयोजी आणि अभिनव कार्य करणाऱ्या अन् देशनिर्माण, राष्ट्रउन्नतीत हातभार लावणाऱ्या युवा 'प्रकाश बेटां'शी दै. 'पुढारी'ने संवाद साधला.
अध्यापनाचा काही वर्षे अनुभव घेऊन 'विद्यार्थ्यांना आज योग्य कला शिक्षण मिळत नाही' हे वास्तव जाणून कला शिक्षणाचा दर्जा उंचवायाचा तर स्वत:चे महाविद्यालय सुरू करावे, असे नागपूरचा युवा चित्रकार प्रथमेश देशपांडे याने ठरवले. चित्रमहर्षी स्व. बापूसाहेब आठवले यांनी सुरू केलेले 'नागपूर स्कूल ऑफ आर्ट' या बंद पडलेल्या संस्थेला २०२२ मध्ये त्याने पुनरुज्जीवन दिले. संस्थेचे भूतपूर्व प्राचार्य अमोल पाटील, बंधू भुपेंद्र कवडते आणि आदित्य भिसिकर यांच्या सहयोगाने कलाशिक्षणाला प्रारंभ केला. देशातील नामवंत कलावंतांशी विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा, त्यांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी 'आर्ट कट्टा' उपक्रमातून एकाच वर्षात सलग २७ देशांतील २७ नामवंत कलावंतांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिकांसाठी आमंत्रित केले. हा विक्रम ठरला. वयाच्या २६ व्या वर्षीच प्रथमेशने प्राचार्यपदाची धुरा उचलली. गेल्या तीन वर्षांत प्राचार्यांसह संस्थेतील एकाही शिक्षक कर्मचाऱ्याने वेतन न घेता ज्ञानदानाचा यज्ञ सुरू ठेवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रवि चाैधरी या युवकाने २०१० मध्ये अवघ्या काही मित्रांना घेऊन रुक्ष, ओसाड जागा हिरव्यागार करण्याचा संकल्प करीत प्रयास संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दर रविवारी हा चमू वृक्षारोपण, संवर्धन करू लागला. मराठवाड्यातील वाढलेले तपमान व दुष्काळ यांचे दृष्टचक्र थांबवायचे तर झाडे जगली पाहिजे अशी खूनगाठ मनाशी बांधून या चमूने १५ वर्षांत आठ लाख वृक्षारोपण केले. त्यातील ९० टक्के वृक्ष जगली आहेत, हे विशेष. यासह प्रयास पक्षी संवर्धन, इकोफ्रेंडली सण-उत्सव, देशी वृक्षांचे बीज संकलन, रोपवाटिका निर्मिती, पालापाचोळा-निर्माल्यांपासून खतनिर्मिती, कृत्रिम बंधारे-पाणवठे उभारणे, अशा उपक्रमातून हिरवे स्वप्न मूर्तिमंत केले जात आहे.
नाशिक येथील सृष्टी देव या युवतीने वडील आणि बहिणीसोबत प्रथम गोदावरी स्वच्छतेला सुरुवात केली. दर रविवारी सकाळी ७ वाजता हे तिघे गोदावरी तटावरील प्लास्टिक बॉटल, कॅरिबॅग तसेच अन्य कचरा उचलू लागले. प्रारंभी तिला हे काम करताना अनेकांनी हिणवले. मध्यमवर्गीय परिवारातील मुलीने करिअरवर लक्ष द्यावे, या कामाने काय साधणार, असे टोमणेही मारले. त्याकडे दुर्लक्ष करून सृष्टीने कार्य सुरूच ठेवले. पुढे याच कामासाठी अनेक नाशिककर गोदाप्रेमी उपक्रमात जोडले गेले. घरातील दोन सदस्यांना घेऊन सृष्टीने सुरू केलेले काम आज मोठी चळवळ झाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत सलग १४७ आठवडे सृष्टी आणि सहकारी गोदा स्वच्छतेचा उपक्रम राबवत आहे. आज तिच्या कामात २०० सदस्य जोडले गेले आहेत.
भारतातील प्रत्येक दुसरा शाळेतील विध्यार्थी आणि जगात २०० कोटी लोक लोह कमतरतेने ग्रासले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक व मानसिक विकासावर होत असताना पुण्यातील महेश लोंढे, स्वाती खेडेकर, विद्या परशुरामकर, पायल कर्डीकर यांनी भरडधान्य (बाजरी) पासून लोहयुक्त 'न्यूट्री डब्बा' विकसित केला. त्यात लाडू, बिस्कीट, न्यूट्री बार, खिचडी, खाकरा, चिवडा असे पदार्थ आहेत, जे मुलांमधील लोहाची गरज भागवते. कुठलेही पोषण मूल्य कमी न करता त्यात 'एआय'चा वापर करून लोहयुक्त बाजरीची टिकवण क्षमता वाढवली आहे. गेल्या वर्षी या चमूला राष्ट्रपती पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. सध्या 'हार्वेस्ट प्लस' संस्थेकडून भारतातील चार राज्यांमधील तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत मोफत डब्बा देण्यात येतो. पुढील पाच वर्षांत २० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. यातून २० हून अधिक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. चमू यासाठी 'सीएसआर' फंडाचा विनियाेग करत आहे.