Nashik Monsoon Tourism : नशा, उन्माद अन् हुल्लडबाजीचे 'पर्यटन'

Pudhari Special Ground Report | जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर नशेबाज तरुणाईचा उच्छाद
नाशिक
पर्यटनाच्या नावाखाली तरुणाईच्या उन्मादाचा ‘ग्राऊंड रिॲलिटी’.(सर्व छायाचित्रे - हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : निल कुलकर्णी

नाशिक जिल्ह्याला धबधबे, धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा, जलाशय, धरणाचे बॅक वाॅटर आणि हिरव्यागार डोंगररांगात धुक्यात हरवेल्या वाटा असे निसर्ग साैंदर्यांचे वरदान लाभलं आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणाईने अशा ठिकाणांवर अक्षरश: हैदोस मांडला आहे. निसर्गसौंदर्यांचा शांत आणि जवाबदारपणे आनंद न घेता तरुणांचे गट येथे राजरोसपणे मद्यपान, अंमलीपदार्थचे सेवन करत कर्कश आवाजात संगीत लावत धिंगाणा-हुल्लडबाजी करत आहेत. नशेत तर्र तरुणाईकडून वाहन वेगाने चालवणे, धोकादायक पद्धतीने धबधब्यांवर जाऊन सेल्फी काढणे. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पर्यटनस्थळांवर थांबून बेजाबदारपणे कृत्य करुन स्वत:चा जीव धोक्यात घालणे. महिलांकडे पाहून आक्षेपार्ह शेरेबाजी करणे, पोलिस, वनविभाग तसेच शासनाचे सुरक्षेचे नियम न पाळणे, हे चित्र नाशिकजवळील पर्यटन क्षेत्रावर दिसते. वाढते टवाळखोर आणि मर्यादीत पोलिस तसेच वनविभागाचे कर्मचारी यामुळे ही पावसाळी पर्यटन केंद्र आता नशा, उन्माद‌ अन् हुल्लडबाजीचे ‘पर्यटन’ केंद्रे झाली आहेत. पर्यटनाच्या नावाखाली तरुणाईच्या उन्मादाचा ही ‘ग्राऊंड रिॲलिटी’.

Summary
  • धोकादायक पद्धतीने सेल्फी काढणे, सुरक्षा नियमांचे उल्लघंन यामुळे दुर्घटनेत वाढ

  • मद्य, गांजासह अमलीपदार्थ सेवनासाठी पर्यटनस्थळाजवळी जागांचा खुलेआम वापर

  • अपुरे पोलिस बळ, वनविभागाचे कर्मचारीही मर्यादित: नियमांची पायमल्ली

  • रिल्स, सेल्फीमुळे उद्ध्वस्त होतेय तरुणाईचे जीवन

नाशिक
नाशिकच्या विविध निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यातील प्रत्येक वीकएण्डला पर्यटकांची गर्दी असते. Pudhari News Network

गैरप्रकाराचे 'शेड'

त्र्यंबकेश्वर येथील पहिनेबारी, दुगारवाडी, साेमेश्वर धबधबा, मुकणे, गंगापूर धरण बॅकवॉटर, भंडारदरा, सादंन व्हॅलीसह अन्य छोटेमोठे धबधबे आदी ठिकाणांवर पावसाळ्यातील प्रत्येक वीकएण्डला पर्यटक गर्दी करतात. तरुणाईचे जथ्थे बेशिस्तपणे वाहने चालवत येथे जाताना दिसतात. पहिनेबारीत कारच्या बोनेटवर चढून खुलेआम मद्यसेवन करणे, गांजा ओढणे असे कृत्य करतात. स्थानिक लोक आपल्या झोपड्या, शेडस‌् पर्यटकांना भाड्याने देतात. त्यात, मद्य, ड्रग्जसारख्या अमलीपदार्थाचे सेवनासोबत अनैतिक गाेष्टीही सर्रास होत असल्याचे धक्कादायक वास्तव दै. 'पुढारी' च्या पाहणीत दिसले. स्थानिकांना पर्यटकांमुळे पैसे मिळत असल्याने तेही पर्यटकांना अशा जागा सहज उपलब्ध करुन देतात.

नाशिक
पहनेबारीतील नेकलेस धबधब्यावर तरुणाई मद्यप्राशन करुन येतात. Pudhari News Network

'नेकलेस' धबधब्यावर तरुणाई 'शेमलेस'

पहनेबारीतील नेकलेस धबधब्यावर तरुणाई मद्यप्राशन करुन येतात. नशेमुळे त्यांच्यातील विवेकबुद्धी क्षीण झालेली असल्यामुळे धोकादायक पद्धतीने सेल्फी काढणे, कपडे काढून अर्धनग्न स्वरुपात किसळवाणे नाचने, महिला-मुलीं, परिवारातील सदस्यांना शेरेबाजी टोमणे मारणे इतकेच काय तर चॉपर, काठ्याने हाणामारी करणे, असे प्रकार सर्रास घडतात. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त असूनही वाढलेल्या गर्दीमुळे त्यांना हुल्लडबाजांवर कारवाई करण्यावर मर्यादा येतात. पहेनेबारी येथे नाशिकच्या विल्होळी पोलिस ठाण्याचा बंदोबस्त असतो. परंतु मर्यादित पोलिस आणि पोलिस स्टेशनपासून ३५ किमीचे दूर अंतर यामुळेही गर्दी तसेच गैरकृत्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस असक्ष ठरत असल्याचे दिसते. वनविभागातर्फे नेकलेस धबधबा पाहण्यासाठी तिकीट आकारले जाते. मात्र, सर्वाधिक हु्ल्लडबाजी याच धबधब्याच्या पाण्यात होत असल्याचे 'पुढारी' चमूला दिसून आले.

त्र्यंबकरोड : प्रत्येक 'वीकएण्ड' ला वाहतूक कोंडी

पावसाळ्यातील प्रत्येक 'वीकएण्ड'ला त्र्यंबकजवळील पहिनेबारी येथील नेकलेस फॉल पाहण्यासाठी प्रचंड पर्यटक येतात. वनविभाग तसेच पोलिस गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करतातही. परंतु त्यांच्यावरही मर्यादा येतात. विल्होळी पोलिस स्टेशन अंतर्गत पहिणेबारी येते. केवळ २० पोलिसांचा फौजफाटा येथे हजारो पर्यटनांवर नियंत्रण ठेवतो. तो खुप अपुरा ठरतो. वीकएण्डला त्र्यंबकरोडवरील पेगलवाडी फाट्यावर मोठी वाहतुक कोंडी होणे नित्याचे झाले आहे. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यांपर्यंत लागत असल्याने त्याचा त्रास त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या धार्मिक पर्यटकांना होतो. रस्त्याच्या दुतर्फा असलेला निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक वाहने थांबवतात. त्यामुळेही वाहतुक कोंडीत भर पडते.

सुरक्षा नियाेजनाचा आभाव

धबधब्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंत, तारेचे कुंपण, सुरक्षा व्यवस्था, धोक्याची सूचना फलक लावणे, पर्यटनस्थळी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर तसेच पर्यटनस्थळी मद्यपिणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. हेल्पलाइन नंबर दर्शनी भागात लावणे

नाशिक
पावसाळी पर्यटन काळात अपघातांच्या संख्येत वाढ होतांना आढळून येते. Pudhari News Network

पावसाळी पर्यटन काळातील अपघात, घटना

  • जुलै २०२५ : ब्रह्मगिरी पर्वतावरुन पडून एक जण मृत्यूमुखी.

  • भंडारदऱ्यादील रंधा फॉलमध्ये यूवक पडला, पोहूनवर आल्याने दुर्घटना टळली.

  • मृत्यूचा डोह : दुगारवाडी

  • दुगारवाडीत ६ जुलैला ४० पर्यटक पाण्याच्या प्रवाहातून सुटका. सुदैवाने जीवितहानी नाही.

  • २०२३ : १७ वर्षिय युवकांचा प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू

  • २०२२ मध्येही २३ पर्यटक पुरात अडकले त्यातील एकाचा मृत्यू तर २२ जणांची सुटका.

  • २०१९ : सेल्फी काढताना एका विद्यार्थींसह ३ युवकांचा मृत्यू.

कळसुबाई- हरिश्चंद्रगड भंडारदरा : सुरक्षा उपाययोजना

  • हरिश्चचंद्रगड, रतनगड, अलंग, मदन, कुलंग सांदनदरी (खालील भाग) येथे १० ऑगस्टपर्यंत पयर्टक बंदी.

  • भंडारदार येथे दररोज केवळ ६०० पर्यटकांनाच प्रवेश. सायंकाळी ५ नंतर कोणत्याही पर्यटकांना जंगलात फिरण्यास मनाई.

  • दुपारी तीन नंतर पर्यटकांना प्रवेशबंदी. राजूर वनपरीक्षेत्रात दररोज केवळ ५०० पर्यटकांना प्रवेश.

आधिकारी म्हणतात : सुरक्षा नियम पाळून पर्यटन करा - पावसाळी पर्यटनाासाठी पर्ययकांनी धोकादायक, प्रतिबंधक क्षेत्रात पोहोण्यासाठी जाऊ नये, धोकादायक ठिकाणी छायाचित्रे, सेल्फी काढणे टाळावे, वाहतुकीसह, सुरक्षेचे नियमांचे पालन करुन सुरक्षित पर्यटनांचा आनंद घ्यावा.

जलज शर्मा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

दंडात्मक कारवाईचे आदेश : रतनगड, संदान व्हॅलीला उतरण्यासाठी खालील भाग पर्यटकांनासाठी सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्यासह, नो- सेल्फी पॉईंट, काही मार्ग दोरी, बॅरीकेटींग लावून बंद केले आहेत. मद्यपान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी निसर्ग संपदेची हानी न करता सुरक्षित आणि आनंदायी पर्यटनाचा आनंद घ्यावा.

रुपेश गावित, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), भंडारदरा.

रिल्स, सेल्फी नकोच : पर्यटकांनी स्वत: काळजी घेऊन सुरक्षित पर्यटन करावे. सेल्फी काढण्यापेक्षा डोळ्यांनी निसर्ग पर्यटनाचा आनंद ‌अधिक आनंदायी असतो. धोकादायक ठिकाणी जाऊच नये. पर्यटन विभागही वेळोवेळी सुरक्षित पर्यटनासाठी सूचना प्रसिद्ध करत असते. स्थानिक संस्था आणि पाेलिसांनी मिळून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्यास अधिक प्रभावी ठरतील.

जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, नाशिक.

वीकएण्डला 'पर्यटकांच्या संख्येवर परिणाम - वीकेएण्डला हु्ल्लडबाजीमुळे महिलांना पावसाळी पर्यटनासाठी नेणे मुश्किल झाले आहे. याचा पर्यटन व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसतोय. शासनानेही पावसाळी पर्यटनस्थळावर सरसगट बंदी घालण्याच्या निणर्याचा फेरविचार करावा. पर्यटक संख्या नियंत्रणासाठी ऑनलाईन नोंदणी असावी. स्थानिक गाईड, सुरक्षा रक्षक नियुक्त करावे. नशेखोरांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवून कडक कारवाईचा बडगा उगारावा.

दत्ता भालेराव, पर्यटन व्यावसायिक.

पालकांचे पाल्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

आपली मुले कुठल्या स्थळी, कोणासोबत जात आहेत. त्यांना कुठली वाईट व्यसने आहेत, त्यांच्या सोबत मोठी जवाबदार व्यक्ती कोणी आहे का? याकडे पालकांनीच लक्ष द्यायला हवे. सर्व जवाबदारी शासन, प्रशासनाची नाही. पालक मुलांच्या हातात पैसा, महागडी वाहने देतात. त्यांना असे अनिर्बंधपणे सोडता येणार नाही ही याची जाणीव ठेऊन पालकांनी मुलांकडे लक्ष देणे पहिले कर्तव्य आहे, असे मत किशोरवयीन मुलांच्या समस्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

१० खाजगी सुरक्षारक्षक, स्थानिक रेस्क्यू चमू - दुगारवाडीला चार नंतर पर्यटकांना बंदी आहे. येथील नदी न ओलांडताही धबधब्याच्या आनंद घेता येतो. त्यासाठी रस्ताही तयार करण्यात आला. हरिहर किल्ला भागात वर पाऊस झाला की, पाण्याचा प्रवाह वाढतो. सुरक्षेसाठी कासोरली गावाच्या स्थानिक मुलांना रेस्क्यूचे प्रशिक्षण देत आहोत. त्यासाठी साहित्य, प्रथमोपचार पेटी, व्हिलचेअर आदी साधनेही लवकरच देणार आहोत. १० खाजगी सुरक्षा रक्षक पर्यटकांचे सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

मधुकर चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी, कासोरली- दुगारवाडी वनक्षेत्र.

नाशिक
पर्यटनस्थळी नशेखोरांची हुल्लडबाजी Pudhari News Network

पर्यटनस्थळी नशेखोरांची हुल्लडबाजी : पर्यटनस्थळांवरील होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, अवैध मद्यविक्रीची ठिकाणे, धाबे येथे कारवाई करण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर शनिवारी २० हजार रुपयांचा दंड आकारला. त्र्यंबक वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी या ठिकाणी हुल्लडबाज, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त फाैजफाटा असतो. पहिणेसाठी ५० पोलिस पर्यटकांवर लक्ष ठेऊन आहेत.

हेमंतकुमार भामरे, पोलिस निरीक्षक, वाडीवाऱ्हे पोलिस ठाणे.

  • गंगापूर बॅकवॉटर, दुगारवाडी येथील रस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद

  • पहिने नेकलेस धबधब्यांजवळ वनविभागाचे २५ कर्मचारी.

  • वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याचे २० पोलिस कर्मचारी

  • मद्य बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे, अन‌् पाणी बॉटलचा मोठा कचरा

  • नियम धाब्यावर बसवून कॉलेज विद्यार्थी ट्रीपल सिट सुसाट.

  • भावली धबधब्यावर दुसऱ्या टप्प्यापर्यंत धोकादायक पद्धतीने चढाई करतात.

पर्यटनस्थळांवर तरुण मुलांच्या टवाळखोरीचा त्रास झाला. मुली-महिलांंना पाहून शेरेबाजी, धबधब्याजवळ कपडे काढून अचकटविकच हावभाव करणे. मोबाइलमधून फोटो काढणे याचा त्रास झाला. परिवारासह आलेल्या सदस्यांना भावली डॅम येथे नशेबांजांचा मोठा त्रास सहन करावा लागला. टवाळखोरांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस जवळपास नव्हते.

विशाखा देशमाने, विजय देशमाने, पर्यटक नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news