

नाशिक : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बस्फोटोतील एका संशयित आरोपीला राष्ट्रीय गुन्हे अन्वेषन (एआयए) पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. पथकाच्या एका अधिकाऱ्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही या कारवाईची माहिती नव्हती. एनआयए आणि गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सातपूर-अंबड लिंकरोडवर ही कारवाई केली. संशयित मागील वर्षभरापासून वेशांतर करून नाशिकमध्ये वास्तव्यास होता.
संशयित आरोपी हा सातपूर भागात नाव बदलून राहत असल्याने, त्याचा तपास करताना पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या शोधासाठी पथकाने प्रत्येक हॉटेलची तपासणी केली. बॉम्बस्फोटातील संशयित एका घरात लपून बसला होता. तो सायंकाळीच बाहेर निघत असे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत तो कामास लागला होता. याठिकाणी तो ओळख लपविण्याच्या प्रयत्नात होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. एनआयएचे पथक नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पतकाने संशयिताला शोधण्यासाठी तपास यंत्रणेसोबत काम केले.
दरम्यान, बॉम्बस्फोटातील संशयित आरोपीस अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाचा एनआयएने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहाय्यक उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंखे, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, राम बर्डे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, नाझीमखान पठाण आदींनी ही कारवाई केली.
संशयिताने दाढी, मिशी आणि डोक्याचे केस काढून दुसऱ्या नावाने आधारकार्ड बनवले. त्याचा वापर करत सातपूरमधील एका कंपनीत नोकरीही मिळविली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्याला जागा कोणी दिली, लपण्यासाठी कोणी मदत केली काय? याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. मागील पाच ते सहा दिवसांपूर्वीच तो नाशिकमध्ये आला होता. मात्र, बस्तान बसण्याच्या आतच त्याला बेड्या ठोकल्या.