

राहुल रनाळकर, नाशिक
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना अखेर कृषी खात्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले; मात्र हे केवळ पदच्युत होणे नव्हते. त्यांना नव्याने क्रीडा खात्याचे मंत्री म्हणून संधी देण्यात आली. राजकीय द़ृष्टीने ही केवळ स्थानांतरणाची बाब नाही, तर एक महत्त्वपूर्ण इशारा आणि ‘शेवटची संधी’ असे मानले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी ‘इजा, बिजा आणि तिजा’ म्हणत कोकाटे यांच्यावर उपरोधिक टीका केली होती. ती टीका केवळ विनोदी नव्हती, तर ती खासगी बैठकीत होणार्या नाराजीचा सार्वजनिक इशारा होती. कोकाटे हे कृषी खात्याचे मंत्री असूनही शेतकर्यांवर चुकीच्या पद्धतीने विधाने करत होते. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटला होता. यामुळे सरकारची आणि पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ लागली होती. विधिमंडळातील रमीच्या खेळाने या सगळ्या प्रकरणाने टोक गाठले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार-एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्रितपणे खातेबदलाचा निर्णय घेतला; मात्र कोकाटे यांचे पूर्णतः मंत्रिपद काढून घेणे म्हणजे सिन्नरमधील आणि एकूणच मराठा समाजाला नाराज करणे, हे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले. शिवाय येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही या निर्णयामागे संदर्भ आहे.
कोकाटे यांचा स्वभाव हट्टी, फटकळ व आक्रमक. यामुळेच त्यांना कारकिर्दीत अनेकदा संधींच्या उंबरठ्यावरून परतीचा रस्ता धरावा लागला आहे. त्यांचे कार्यकर्ते साहेबांनी तब्बल दोन दिवस संयम पाळला असे बोलत आहेत. किंबहुना हेच त्यांच्या उग्र शैलीचे बोलके उदाहरण आहे. राजकीय निरीक्षकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, कोकाटे यांनी त्यांच्या स्वभावात वेळेवर बदल केला असता, तर त्यांना मंत्रिपद खूप आधी मिळाले असते.
कोकाटेंच्या जवळच्या सूत्रांनुसार त्यांना कृषी खाते किचकट आणि अवघड वाटत होते. शेतकर्यांची असंतोषाची लाट, पीक विम्याची गुंतागुंत, हवामान बदलामुळे उद्भवणार्या संकटांवर प्रभावी उपाययोजना आणि या सगळ्यांमध्ये संयत भाषाशैलीचा अभाव यामुळे त्यांच्यावर संकट ओढवले. खात्यांचे वाटप होताना त्याचवेळी योग्य समन्वय ठेवण्यात आला असता व दादा भुसे यांच्याकडे ‘कृषी’ आणि कोकाटे यांच्याकडे ‘शिक्षण’ दिले असते, तर दोघेही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकले असते, असे जाणकारांचे मत आहे.
कृषी खात्यातून दूर करून कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देण्यात आले. बर्याचदा याकडे ‘साईड पोस्टिंग’ म्हणून पाहिले जाते; मात्र असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विशेषतः राज्याच्या तरुण खेळाडूंच्या भविष्यासाठी. सध्या राज्यातील क्रीडा क्षेत्र अनेक अडचणींना तोंड देत आहे. या क्षेत्रात मंत्री म्हणून काम करताना सहानुभूती, संयम आणि व्यापक द़ृष्टिकोन आवश्यक आहे. जे कोकाटेंच्या आतापर्यंतच्या शैलीपेक्षा वेगळे आहेत.
क्रीडा खाते कोकाटेंसाठी एक प्रकारची ‘राजकीय रिडेम्प्शन आर्क’ आहे. कृषी खात्यातून जे गमावले, ते इथे पुन्हा मिळवता येऊ शकते. त्यांनी पुढील गोष्टींचे भान ठेवावे.
तरुण खेळाडूंना प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तींची संधी
क्रीडा स्पर्धांमध्ये पारदर्शकतेची हमी
जिल्हा पातळीवर नव्या सुविधा उभारणे
महिला, दिव्यांग आणि ग्रामीण खेळाडूंना विशेष प्रोत्साहन
तरुणांसाठी साहसी क्रीडांचा विस्तार आणि करिअर संधी
कोकाटेंना आता स्वतःच्या पूर्वीच्या प्रतिमेत बदल करावा लागणार आहे. यापुढे त्यांना क्रीडा मंडळे, संघटनांचे प्रतिनिधी, खेळाडू, प्रशिक्षक आणि तरुण कार्यकर्त्यांशी सहकार्याचे नाते निर्माण करावे लागेल. राजकीयद़ृष्ट्या कोकाटे हे ‘वजनदार’ नेते आहेत; मात्र आता त्यांची कसोटी ‘कार्यक्षमता आणि सहकार्य’ या दोन निकषांवर लागेल. क्रीडा खाते म्हणजे केवळ उद्घाटनं किंवा पारितोषिकं वाटण्याचं काम नक्कीच नाही. त्यांनी खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तर राज्याच्या क्रीडा क्षेत्रात युगांतर घडू शकते आणि कोकाटे यांची प्रतिमादेखील पूर्णतः पालटू शकते; मात्र असे होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोकाटेंना मिळालेली ही संधी केवळ मंत्रिपद राखण्यापुरती नसावी. ही ‘प्रतिमा पुनर्बांधणीची आणि जनविश्वास परत मिळवण्याची संधी’ आहे. सिन्नरच्या जनतेने आणि पक्षश्रेष्ठींनी अजून एकदा विश्वास दाखवला आहे. आता संयम, जबाबदारी आणि व्यावहारिक धोरणशैली यांची जोड देत कोकाटेंनी खेळाडूंमध्ये आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.