

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या विवाह सोहळ्यांची धूम सुरू झाली आहे. तुळशीविवाह पार पडताच विवाह सोहळ्यांना सुरुवात होत असून, नोव्हेंबर महिन्यात तीन, डिसेंबरमध्ये सहा विवाह मुहूर्त आहेत. त्यानंतर जानेवारी ते जुलै या कालावधीतही भरगच्च विवाह मुहूर्त असल्यामुळे आगामी काळात लग्नसराईची धामधूम कायम राहील. विवाह सोहळ्यांचा आनंद साजरा करताना वाढती महागाई मात्र यजमानांच्या आर्थिक नियोजनाची परीक्षा घेत आहे.
लॉन्सचे भाडे, भोजनव्यवस्था, मंडप सजावट, फुलांचे दर, छायाचित्रण, वधू-वरांचे पोशाख अशा प्रत्येक बाबींच्या खर्चात वाढ झाल्यामुळे सनई-चौघड्यांच्या सुरात महागाईचा सूर चिंता वाढवित आहे. पूर्वी ठराविक बजेटमध्ये विवाह सोहळा उरकणे शक्य होत होते. मात्र, आता पाहुण्यांची संख्या, भोजनाचा मेनू, आकर्षक सजावट, प्रकाशयोजना, छायाचित्रण आणि विविध सोहळ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्थेमुळे खर्चात भरच पडत आहे.
विशेषतः विवाहासाठी लॉन्स किंवा तारखेनुसार आणि सुविधांनुसार वेगवेगळे दर आकारले जात आहेत. भोजनव्यवस्थेचा खर्च हा विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा भाग ठरत आहे. पाहुण्यांची संख्या वाढली की, प्रतिप्लेट दरातील किरकोळ वाढही एकूण खर्चात मोठी भर घालते. खाद्यपदार्थांच्या कच्च्या मालाच्या किमती, कामगारांचे मानधन आणि इंधन खर्चाचाही परिणाम भोजनव्यवस्थेच्या दरांवर होत आहे.
दुसरीकडे, आकर्षक मंडप, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि छायाचित्रणासाठी विशेष व्यवस्था समाजमाध्यमांवरील आकर्षक विवाह सोहळ्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांत अनेक कुटुंबांचा मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक खर्च होत आहे. वधू-वरांचे पोशाख, दागिने, मेकअप, पाहुण्यांची वाहतूक आणि निवासव्यवस्था यामुळेही खर्चाचा.
सध्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात थोडी वाढ झाली आहे. अशातही आम्ही ग्राहकांच्या बजेटनुसार सोहळा सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत असतो. महागाईमुळे झालेल्या दरवाढीने व्यवसाय करणे त्रासदायक ठरत आहे.
- केशव डिंगोरे, अध्यक्ष, जिल्हा मंडप व डेकोरेशन असो.