नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत चार दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. या काळात पुलावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सकाळी ५ ते ६, दुपारी १ ते २, दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत पूर्णपणे बंद ठेवणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पिंपळगाव बहुला ते नंदिनी नदीवरील पुलाच्या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काम सुरू असताना पुलावरून वाहनांची ये जा सुरू ठेवल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी याबाबत वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदी पुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
वाहतूक बंद मार्ग
१) त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपळगाव बहुला पुलाखालील नाका येथे पूर्णपणे बंदी राहील. २) नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपळगाव बहुला बसस्थानक येथे पूर्णपणे बंदी राहील.
पर्यायी मार्ग सुरू
१) त्र्यंबकेश्वरकडून येणारी वाहतूक महिरावणी येथे डायव्हर्जन गिरणारेमार्गे नाशिककडे वळविण्यात येईल.
२. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक अमृत चौक येथून डायव्हर्जन करून अशोकनगर -कार्बन नाका - बारदान फाटामार्गे वळविण्यात येईल