

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनामध्ये काही अपप्रवृत्तीने विद्यार्थी तसेच हे एकूणच भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आता नाशिकमधून होर्डिंग्जद्वारे उत्तर देण्यात आले आहे. 'वी सपोर्ट नेशन' या टॅगलाईनखाली राष्ट्र प्रथम असा संदेश दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे.
अलीकडेच नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. युवाशक्तीची दखल घेत केंद्र शासनाने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामादेखील घेतला. या आंदोलनादरम्यान काही वक्तव्यांमधून पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलिस तसेच इतर राष्ट्रीय संस्थांबाबत अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता.
यामध्ये काही विरोधी पक्षांचा समावेश असल्याचीदेखील बाब पुढे आली होती. या प्रकारातून प्रामुख्याने देशातील जेन-जी अर्थातच युवाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. नाशिकमध्ये कँडल मार्चद्वारे निघालेल्या समर्थन मोर्चामध्येदेखील काही अपप्रवृत्तींनी देशातील तरुणांना बदनाम करण्याचा प्रकार केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर देशाच्या संस्था, सुरक्षा दल, विद्यार्थी आणि हिंदू देवतांप्रति समर्थन व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच सिग्नलवर आता होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
या होर्डिंग्जवर 'नेशन फर्स्ट' अर्थातच 'राष्ट्र प्रथम' असा संदेशही ठळकपणे देण्यात आला आहे. देशाची एकता, राष्ट्रीय संस्था, जवान, पोलिस, विद्यार्थी आणि सांस्कृतिक श्रद्धास्थानांबाबत सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 'वी सपोर्ट पीएम', 'वी सपोर्ट आर्मी, यूथ, पोलिस' अशाही घोषणा आहेत. दरम्यान, या होर्डिंग्जची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे या फोटोची सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे.