

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा वनवास संपणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासह नव्याने जलवाहिन्या टाकण्याच्या ३०५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीत प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी कोल्हापूर स्थित लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हिसेस या मक्तेदार कंपनीसोबत करारनामा केला जाणार आहे.
नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेअंतर्गत नाशिकसाठी २८४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या योजनेसाठी तब्बल चार वेळा निविदा प्रक्रिया राबवून देखील मक्तेदारांचा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. निविदा प्रक्रियेतील अनुभवाची अट यासाठी अडचणीची ठरत होती. त्यामुळे महापालिकेने पाचव्यांचा निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदारांची निविदा पूर्व बैठक घेऊन अनुभवाची अट दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला. नव्याने दहा वर्षातील कामाच्या अनुभवाची नवी अट निविदेत अंतर्भूत केली गेली होती. त्याचा फायदा महापालिकेला होवून पाच मक्तेदारांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला.
यात लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हिसेस प्रा. लि. या मक्तेदाराची निविदा सर्वात कमी अर्थात प्राकलन दरापेक्षा ९.९ टक्के कमी दराची प्राप्त झाली होती. २८४ कोटींवरून सदरचे काम २५८ कोटींपर्यंत कमी झाले होते. जीएसटी आणि रॉयल्टीसह रक्कम आता ३०५ कोटींपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे मक्तेदाराला कार्यारंभ देण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्याला आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे.
३०५.१२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी अमृत २ योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून ५० टक्के अर्थात १५३ कोटींचा निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी खर्चाची जबाबदारी महापालिकेला उचलावी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रविंद्र धारणकर यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत शिवाजीनगर व गांधीनगर येथील अस्तित्वातील जलशुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण व दुरूस्तीसाठी ११.१२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. चेहडी पंपींग ते नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत मुख्य वितरण वाहिनी बदलणे, कार्बन नाका ते रामालय जलकुंभापर्यंत ७०० मिमी जलवाहिनी, शिवाजीनगर ते कार्बननाका ते पपया नर्सरी, बारा बंगला ते गांधीनगर तसेच रामराज्य ते नहुश जलकुंभापर्यंत अस्तित्वातील पीएससी जलवाहिनी बदलणे व पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र ते शक्तीनगरपर्यंत ६०० मिमी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी ९५.२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी तसेच नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन जलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी १७९.२१ कोटींचा खर्च केला जाणार आहे.