नाशिक : मे मधील अवकाळी आणि वेळेवर मान्सूनने दिलेल्या दमदार सलामीने यंदा मराठवाडाविरुद्ध नाशिक, असा पाणीतंटा निर्माण होणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समूहातून १ जूनपासून आतापर्यंत, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १४ हजार १५२ दशलक्ष घनफूट म्हणजेच १४.१५२ टीएमसी पाणी नाथसागर (जायकवाडी) जलाशयाकडे वाहून गेले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून मराठवाड्याकडे पाणी प्रवाही होत असल्याने जायकवाडी धरणात गुरुवार (दि. ३)पर्यंत ९८९ दलघमी म्हणजेच ४५.५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दरम्यान या धरणात केवळ ४.४० टक्के इतकाच साठा होता.
धरण परिचालन सूचीनुसार आगस्टपर्यंत मोठ्या धरणांमध्ये ८८ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा करता येत नाही. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जूनच्या प्रारंभीपासूनच समाधानकारक पर्जन्यवृष्टी होत असल्याने काही दिवसांतच मोठ्या धरणांचा जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. परिणामी, जलसाठा मर्यादित ठेवण्यासाठी या धरणांमधून सातत्याने विसर्ग होत आहे. नाशिक जिल्ह्यातून १ जूनपासून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून आतापर्यंत एक लाख ६३ हजार ७३७ क्यूसेक वेगाने १४ हजार १५२ दलघफू म्हणजेच १४ टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीला गेले. साधारण महिनाभरापासून गोदावरी दुथडी वाहत असल्याने मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या 'नाथसागर'चा कुंभ ४५.५६ टक्क्यांपर्यंत भरला आहे. पावसाळ्याचा अजून तीन महिन्यांचा हंगाम शिल्लक असून, आता सरासरी पर्जन्यमान जरी राहिले तरी जायकवाडी धरण विक्रमी वेळेत भरून ओसंडेल, अशी सद्यस्थिती आहे. आजघडीला गंगापूर धरणातून 3716 क्यूसेक, दारणातून ४२१४ क्यूसेक, तर पालखेडमधून १५०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात मध्यम ते संततधार स्वरूपात पावसाची रिपरिप सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 259 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 'गंगापूर'चा साठा पुन्हा ६१ टक्क्यांवर गेला आहे. 'दारणा'चाही ५५ टक्क्यांवर जलसाठा मर्यादित ठेवला गेला आहे. जिल्ह्यातील एकूण २६ प्रकल्पांमध्ये ५३.१६ टक्के म्हणजेच ३७ हजार ५४४ दलघफू साठा झाला आहे. गतवर्षी आजघडीला केवळ ७.६२ टक्के एवढाच जलसाठा होता. एकूणच जलस्थिती समाधानकारक आहे.
महिन्याभरापासून नाशिकसह अपवाद वगळता जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. शहरात 1 जून ते 1 जुलै या काळात 259 मिलिमीटर पर्जन्याची नोंद मेरी येथील हवामान विभागात झाली आहे. मे मध्ये 187 मिमी पाऊस झाला होता. शहरात यापूर्वी जून 2017 मध्ये सर्वाधिक 249.4 मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले होते. यंदा हा विक्रमी मोडीत निघाला आहे.