

नाशिक : विकास गामणे
जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष स्त्रोतांवर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची एफ.टी.के किटच्या सहाय्याने तपासणी होत आहे. त्यासाठी शासनाकडून जिल्ह्यातील एक हजार ९१० गावांना फिल्टर किटचे वाटप करण्यात आले आहे. यात जिल्हाभरात मोहीम स्वरूपात पाणी स्त्रोतांची तपासणी होत आहे. यामुळे गावात काॅलरासह साथ रोंगावर नियंत्रण ठेवण्यात येत असून, लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.
केंद्र सरकार जीवन मिशन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या (फिल्ड टेस्ट किटच्या) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येत आहे. याकरिता प्रती महसूल गावात पाच महिलांची निवड करण्यात आली असून, या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित महिलांकडून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर गावनिहाय पाणी गुणवत्ता तपासणीकरिता महसूल गावनिहाय पाच महिलांना जैविक फिल्ड टेस्ट किटबाबत प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षित महिलांच्या माध्यमातून एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक एफ.टी. के. (बाटली) व रासायनिक एफ.टी. के वापरून तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून फिल्ड टेस्ट किट प्राप्त झाले असून, त्याचे तालुकापातळीवर वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात जलजन्य आजार होऊ नयेत. तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उच्चप्रतीची राखली जावी तसेच पाणी गुणवत्ता कार्यक्रम महिलांना आपलासा वाटावा. ग्रामीण भागातील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी स्थानिक पातळीवर सरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, एफ. टी. के. च्या वितरण व वापरासाठी जनजागृती हा या मागचा शासनाचा हेतू आहे.
एफ.टी. के (बाटली)मध्ये खुणेपर्यंत पिण्याचे पिण्याच्या स्तोतांचे पाणी भरण्यात येते, बाटली कक्ष तापमानास 24 तास ठेवावी, 24 तासांनंतर बाटलीतील पाण्याचा रंग बदलला (काळा झाला) तर पाणी पिण्यास अयोग्य आहे, असे समजण्यात येते. अशा वेळेस पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे टीसीएल पावडर टाकून शुध्दीकरण करण्यात येते.
रासायनिक एफ. टी. के तपासणी घटक : क्लोराईड, एकूण कठीणपणा, अल्कलीनी, लोह, नायट्रेड, फ्लोराइड, अवशेष क्लोरीन, पी. एच, गढूळपणा
रासायनिक एफ. टी. के तील समाविष्ट साहित्य : अभिक्रियाकारक, पी. एच. पट्टी, परीक्षानळी, रंगतक्ता, हातमोजे, मार्गदर्शक पुस्तिका
ग्रामपंचायतस्तरावर चाचणी
स्थानिक लोकांचा सहभाग
नियमित पाणी परिक्षण
जल जीवन मिशनचे उद्दिष्ट्य साध्य
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक सशक्तीकरणाचाही भाग आहे. जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एफ.टी.के. मार्फत पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर जल सुरक्षा सुनिश्चित होत असून जलजीवन मिशनचा शुद्ध पाणी पुरविण्याचा उददेश साध्य होत आहे..
दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
तालुकानिहाय झालेले स्टेट किट वाटप
तालुका- गावे- रासायनिक- जैविक
बागलाण- 168-168- 9404
चांदवड- 111-111- 6216
देवळा- 49- 49- 2744
दिंडोरी- 156- 156- 8736
इगतपुरी- 117- 117- 6552
कळवण- 151- 117- 8456
मालेगाव-142- 142- 7952
नांदगाव- 99- 99- 5544
नाशिक- 76- 76- 4256
निफाड- 132- 132- 7392
सिन्नर- 128-128- 7168
पेठ- 144- 144- 8064
सुरगाणा- 190- 190- 10640
त्र्यंबकेश्वर- 124- 124- 6944
येवला- 124- 124- 6944
एकूण- 1911- 1911- 107016