

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्यनगरीत होऊ घातलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मविप्रच्या विद्यार्थ्यांनी संमेलनस्थळी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या महाराष्ट्रातील १२ या किल्ल्यांच्या प्रतिकृतींमधून मराठीजनांना शिवकालीन इतिहासाचे जिवंत दर्शन घडणार आहे. गोदावरीच्या तीरावर केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात साकारणाऱ्या प्रत्येक किल्ल्याची भौगोलिक रचना, स्थापत्यशैली, तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठ्यांच्या सागरी व भू-स्थळ संरक्षण व्यवस्थेची ओळख करून देण्यात आली आहे. मविप्रच्या या उपक्रमाचे शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळून इतिहास व संस्कृतीचे जतन करण्याची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री अॅड. नीलम शिर्के सावंत, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्रा. शशिकांत मोगल आदी मान्यवरांनी भेट देत मुलांचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान नव्या पिढीमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. किल्ल्यांच्या या प्रतिकृती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. साल्हेर ते जंजिरा.... किल्ले साल्हेर, शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, लोहगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खंडेरी, राजगड, पन्हाळा आणि जंजिरा या सर्व किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्याच्या संरक्षण व युद्धनीतीचे प्रतीक म्हणून जागतिक वारसास्थळ यादीत मान्यता मिळालेली आहे.
.... या शाळांचा सहभाग
या उपक्रमात मराठा हायस्कूल, होरायझन सीबीएससी स्कूल, होरायझन आयसीएससी स्कूल, उदाजी होरायझन स्कूल, होरायझन इंटरनॅशनल स्कूल सिडको, सातपूर जनता विद्यालय, पवननगर जनता विद्यालय, मखमलाबाद जनता विद्यालय, वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय-मखमलाबाद, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पेठे हायस्कूल तसेच ललित कला महाविद्यालयाच्या कला-शिल्प टीमने सहभाग घेतला आहे. विद्यार्थी आणि कलाशिक्षकांनी अत्यंत मेहनतीने आणि कलात्मकतेने या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
कविवर्य कुसुमाग्रजांच्या साहित्यनगरीत आणि मविप्रच्या प्रांगणात चौथे विश्व मराठी संमेलन होत असल्याने संस्थेतील सर्व सेवक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. चिमुकल्या हातांनी कलाशिक्षकांच्या मदतीने किल्ल्यांच्या अप्रतिम प्रतिकृती साकारल्या आहेत. जगभरातून येणाऱ्या मराठीजनांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या १२ किल्ल्यांचे दर्शन घडविले जाणार आहे.
अॅड. नितीन ठाकरे, स्वागताध्यक्ष, विश्व मराठी संमेलन, सरचिटणीस, मविप्र, नाशिक
विद्यार्थी, २ इतिहास विभागाचे व २ ललित कला महाविद्यालयाचे विद्यार्थी व १ कलाशिक्षक काम करत आहेत. त्याचसोबत प्रत्येक शाळेतील सहा-सहा विद्यार्थी या किल्ल्यांबाबतची माहिती देणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने ती हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
- प्रा. स्मिता कासार-पाटील, वास्तुविशारद, मविप्र आर्किटेक्चर महाविद्यालय