

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चित्रपटांमध्ये आधुनिकीकरण झाल्याने या क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. दाक्षिणात्य, हिंदी किंवा हॉलिवुड पटात आधुनिकीकरणाची झलक बधावयास मिळते. असे असले तरी, मराठी, मल्याळम् चित्रपटांचा विचार केल्यास 'गोष्ट' महत्त्वाची आहे, ही बाब नाकारता येणार नाही.
कारण आजही लोक 'गोष्ट' समजून घेण्यासाठी चित्रपटगृहात जातात. त्यामुळे जेवढी सशक्त 'गोष्ट' तेवढे चित्रपटाचे भवितव्य उज्ज्वल, असा सूर 'मराठी चित्रपटातील आधुनिकीकरण' या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी 'एआय' या नव्या तंत्रावरून मान्यवरांमध्ये मतभेददेखील दिसून आले.
चौथ्या विश्व मराठी संमेलनात शाहीर वामनदादा कर्डक मंच रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित चर्चासत्रात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, मराठी नाट्य-चित्रपट निमति, दिग्दर्शक आणि पटकथालेखक कुमार सोहोनी, लेखक, दिग्दर्शक संतोष रासकर आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी जब्बार पटेल यांनी, आधुनिकीकरण आणि चित्रपट यात खूप घटक आहेत.
चित्रपट हा नाटक, संगीत, तंत्र याद्वारे निर्मित होत असतो. सिनेमा बोलावा असे दादासाहेब फाळके यांना वाटत होते. मात्र, जेव्हा हे तंत्र विकसित झाले, तेव्हा मात्र दादासाहेबांसमोरही प्रश्न निर्माण झाला होता. आधुनिकीकरणावर जे काम करतात, त्यांचा इतिहास मागे धावतो. त्यामुळे आधुनिकीकरण कायम चालू राहणार आहे. मात्र, कितीही आधुनिकीकरण होत असले तरी, चित्रपटातील गोष्ट महत्त्वाची आहे.
मराठी आणि मल्याळम् चित्रपटसृष्टीत ती प्रकषनि दिसून येत. गोष्ट कशी सांगता त्यावर चित्रपटाचे भवितव्य अवलंबून आहे. महेश मांजरेकर म्हणाले, आधुनिकीकरण दिग्दर्शक, निर्माता यांच्या हातात नसते. तंत्र जसे बदलते, तसेच आधुनिकीकरण होत असते. आता होत असलेले आधुनिकीकरण हे चित्रपटांसाठी अधोगतिकरण ठरण्याची शक्यता आहे. कारण एआयच्या युगात चित्रपटसृष्टीच नष्ट होईल, अशी मला भीती आहे.
दोनशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा स्टुडिओमध्ये बसून एआयला प्रॉम्प्ट देऊन हवा तसा नट, कथा आणि लोकेशनवरून चित्रपट बनविता येणार आहेत, हे तंत्र प्रत्येकाच्या हातात येणार असल्याने, दिवसाला एक लाख चित्रपट बनवणे शक्य होणार आहे. खरं तर मागच्या आठवणी पुसून आधुनिकरण होत असते, जे मला अजिबातच पटत नाही. तसेच या देशात हिंदी सर्वांना येत असल्याने, मराठी चित्रपटांची कथा देशपातळीवर चालेल अशी असायला हवी, असेही ते म्हणाले. संतोष रासकर यांनी, तंत्रज्ञानाचा चित्रपटांना फायदाच होणार आहे.
सध्या प्रेक्षकांची टेस्ट बदलली आहे. त्यामुळे उत्तमोत्तम निर्मिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान त्याला फायदेशीर ठरणार आहे. कुमार सोहोनी म्हणाले, चित्रपटात आधुनिकीकरण असायलाच हवे. मात्र, पटकथा हा चित्रपटावा आत्मा असल्याने, ती सशक्त असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मेघराजराजे भोसले म्हणाले, मराठी चित्रपटनिर्मिती काय? हे शिकवणे गरजेचे आहे. कारण शिक्षण नसेल तर चांगली कलाकृती बिघडण्याची शक्यता असते. चित्रपटांमध्ये कितीही आधुनिकीकरण होत असले तरी, चित्रपटाची कथा हो मातीतील असायला हवी. प्रशांत साजणीकर यांनी संबादक केले.
मांजरेकर-रासकर यांच्यात जुगलबंदी
'एआय' मुळे चित्रपटांचे आधुनिकीकरण नव्हे तर अधोगतीकरण होणार आहे. एआय चित्रपटसृष्टीच संपून टाकेल, अशी भीती व्यक्त केली. मात्र, संतोष रासकर यांनी, एआयमुळे चित्रपटसृष्टीला लाभहोईल, अशी भूमिका मांडली. कारण महेश मांजरेकर यांच्यातील दर्जा इतरांकडे असू शकत नाही. त्यामुळे कितीही एआय आले तरी, मांजरेकर हे एकच असतील, असे स्पष्ट मत रासकर यांनी मांडले.
तर मांजरेकर यांनी, जेव्हा जेव्हा आधुनिकीकरण झाले, तेव्हा-तेव्हा काही गोष्ट मारल्या गेल्या. पोस्टमन, अलार्म हे गोष्ट आधुनिकीकरणामुळे संपल्याचे सांगत एआय आता चित्रपटसृष्टीलाच संपून टाकणार असल्याचे सांगितले. त्यात कुमार सोहोनी यांनी उडी घेत असे काही होणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. या जुगलबंदीमुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.