

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी झाल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये नियोजन कोलमोडले. उसळलेल्या अभूतपूर्व गर्दीमुळे आणि रेटऱ्यात चेंगराचेंगरीची घटना होता होता राहिली असल्याची जाहीर कबुली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आगामी सिंहस्थ तयारीच्या दृष्टीने आमच्यासाठी हा मोठा धडा आहे. यासाठी प्रशासनाने आगामी रविवार आणि श्रावणी सोमवारासाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे.
श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येईल. भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वरमध्ये शंभर खाटांचे खासगी रुग्णालय सिंहस्थात भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (दि.१९) दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री महाजन बोलत होते.