

पुढारी ऑनलाइन डेस्क | ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हे गंभीर आरोप केले. त्यावरुन ठाकरे यांचा पक्ष आक्रमक झाला असून गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येतो आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांचा समाचार घेतला असतानाच आता ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हेंवर खळबळजनक आरोप केला आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा खुलासा नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला आहे.
पांडे यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषदेत गोऱ्हे यांच्यावर थेट पैसे घेतल्याचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणूकीसाठी मी आणि अजय बोरस्ते दोघेही मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होतो. त्यावेळी, नीलम गोऱ्हे यांचा एक कार्यकर्ता होता. त्याने नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का म्हणून विचारणा केली. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम पोहचवली. त्यानंतर तिकीट मात्र अजय बोरस्ते यांना देण्यात आले. म्हणून मी त्यांना मला पैसे परत द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल असा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिल्याचा गौप्यस्फोट पांडे यांनी केला.
विनायक पांडे पुढे म्हणाले की, मराठी साहित्य संमेलन होते तिथे त्यांनी अशी भूमिका मांडायला नको होती. आता राज्यातील अनेक नेते पुढे येतील. पैसा दिल्याशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हती. मला 43 वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. पण नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले. या बाईने जिथे जिथे संपर्क नेते होते, तिथे असेच केले आहे. तिकीटासाठी माझ्याकडे पैसे मागितले पण तिकीट अजय बोरस्ते यांना दिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलल्या आरोपांमुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह अन्य ठिकाणीही ठाकरे गटाकडून गोऱ्हे यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. पुण्यात गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाने चार वेळा आमदारकी दिली, उपसभापतिपद दिले आहे. गोर्हे यांनी पाच मर्सिडीज दिल्या असतील, त्याची पावती दाखवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.