

नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान नऊशे गावे आहेत. या प्रत्येक गावातून एक जरी उद्योजक निर्माण केल्यास ३६ जिल्ह्यांमधून साधारणत: ३६ हजार उद्योजक तयार होतील. शेतकऱ्यांच्या मुलांमधून उद्योजक घडविण्याची योजना असून, त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयातून तर ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतीच्या समन्वयातून उद्योजक घडविण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी केली. यावेळी त्यांनी सर्वांना सोबत घेवून सकारात्मक ऊर्जेने काम करणार असल्याचेही स्पष्ट केले.
अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आलेल्या माणगावे यांनी गुरुवारी (दि. १६) महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, एका गावातून किमान एक उद्योजक घडवल्यास जिल्ह्यातून नऊशे ते हजार, तर राज्यातून ३६ हजारांहून अधिक उद्योजक निर्माण होतील. जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयातून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायतींशी पत्रव्यवहार करून प्रत्येक गावातून एक व्यक्ती निवडली जाईल. या उपक्रमात त्या-त्या जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांना सहभागी करून घेतले जाईल.
याशिवाय राज्यातील उद्योग व अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने अभियान राबवले जाईल. नाशिकसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यांमध्ये कृषीप्रक्रिया केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हा देशाचा कणा असून, मोठे उद्योग आले तर ठीकच; पण 'एमएसएमई'ना बळकटी देण्यासाठी चेंबरच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील. त्यातून उद्योगांचे विकेंद्रीकरण वाढू शकेल. दरम्यान, नाशिक तालुक्यातील राजूरबहुला येथे महिला उद्योग क्लस्टरसाठी जागा राखीव ठेवण्यात आली असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती नीलिमा पाटील यांनी दिली.
यावेळी माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष संजय सोनवणे, राजेंद्र डुंगरवाल आदी उपस्थित होते. भावेश माणेक यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, तर अंजू सिंघल यांनी आभार मानले.
गांधींनी स्वत:हून पदभार सोपविला
महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदावरून उद्भवलेला वाद माणगावे यांच्या निवडीनंतर संपल्याचे चित्र दिसत असतानाच, गेल्या १३ ऑक्टोंबर रोजी माजी अध्यक्ष ललित गांधी यांनी पेपर नोटीस प्रसिद्ध केल्याने तो कायम असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, याबाबत माणगावे यांना विचारले असता त्यांनी, ललित गांधी यांनी स्वत:हून राजीनामा देवून पदभार सोपविल्याचे स्पष्ट केले. तसेच याबाबतचा ई-मेल देखील आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. जे झाले ते झाले. आता सकारात्मकपणे काम करायचे आहे. गांधींसह सर्वच माझी अध्यक्षांनी चांगले काम केले आहे. मला सर्वांना सोबत घेवून काम करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.