नाशिक : आदिवासींचे आरक्षण कोणीही काढू शकणार नाही ते कायम राहणार, आदिवासींच्या सोई, सवलती कधीही रद्द होणार नाहीत, आदिवासींनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी केले. आदिवासी विकास महामंडळाची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 5) गंगापूर रोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये झाली. यावेळी मंत्री गावित यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. व्यासपीठावर आ. नरहरी झिरवाळ, आ. सुनील भुसारा यांच्यासह आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, संचालक मंडळ उपस्थित होते. (Tribal Development Minister Vijaykumar Gavit said that no one will be able to remove the reservation of tribals, it will remain forever, the comforts and concessions of tribals will never be cancelled)
आ. झिरवाळ म्हणाले, शासनस्तरावर कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कागदपत्रांअभावी आदिवासींना योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी आदिवासींनी, विकास संस्थांच्या सदस्यांनी कागदपत्रांची पूर्तता योग्य पद्धतीने करावी. महामंडळाने पारध्यांना उद्योगपती बनविले, ही कमाल व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याची मिश्किली त्यांनी यावेळी केली तसेच अनुदानाचे 2 लाख 40 हजार 100 टक्के मिळतील अशी ग्वाहीही दिली. तसेच नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर केल्यास 15 दिवसांत मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले. लीना बनसोड यांनी धानखरेदीतील घटतूट एक टक्का मान्य करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शेतकर्यांसोबत केला जाणारा धानखरेदीचा व्यवहार महामंडळाच्या अकाउंट बुक्समध्ये नोंद करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे मार्केटिंग करण्यासाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स याठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री सुरू केली जाणार आहे. तसेच 'शबरी नॅचरल्स' या ब्रँडचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. ही सर्व उत्पादने ऑनलाइन उपलब्ध होतील, अशी माहिती लीना बनसोड यांनी दिली.