Maharashtra Police Vacancies | महाराष्ट्र पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

Maharashtra Police Vacancies | मंजूर मनुष्यबळाच्या10.35 टक्के पदांवर पोलिस उपलब्धच नाहीत
Maharashtra Police
Maharashtra PolicePudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : निखिल रोकडे

एकीकडे वाढती लोकसंख्या, दुसरीकडे गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, त्यात सायबर गुन्ह्यांचे आव्हान, वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, सण-उत्सवांची सुरक्षा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा वाढता व्याप, या सगळ्या आघाड्यांवर महाराष्ट्र पोलिस दल झुंजत असताना याच दलाच्या मनुष्यबळावर मात्र रिक्त पदांचे सावट कायम आहे.

Maharashtra Police
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

मंजूर २ लाख २५ हजार ४६१ पदांपैकी तब्बल २३ हजार ३२० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच मंजूर मनुष्यबळाच्या १०.३५ टक्के पदांवर पोलिस उपलब्ध नाहीत.
३० जून २०२६ अखेर राज्य पोलिस दलात २ लाख २ हजार १४१ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.

सर्वाधिक तूट पोलिस शिपाई संवर्गात असून, मंजूर १ लाख २६ हजार ४०९ पदांपैकी १ लाख १० हजार १९३ पदे भरलेली आहेत. तब्बल १६ हजार ५१६ पदे रिक्त आहेत. पोलिस ठाण्याचा प्रत्यक्ष भार सांभाळणाऱ्या या स्तरावरच एवढी मोठी तूट असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. गस्त, बंदोबस्त, तक्रारींची नोंद, आरोपींचा शोध, न्यायालयीन कामकाज आणि तपास अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येतात.

Maharashtra Police
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

तपास अधिकाऱ्यांचीही संख्या अपुरी:

पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील ११,८८४ मंजूर पदांपैकी २,८७८ पदे रिक्त आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांच्या २०,९९१ पदांपैकी १,५६२ पदे रिक्त आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या ४,७९१ पदांपैकी २८७, तर पोलिस निरीक्षकांच्या ४,२५३ पदांपैकी ५२१ पदे रिक्त आहेत. एकत तपास अधिकाऱ्याकडे एकाच वेळी अनेक गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध, पंचनामे, कागदपत्रांची पूर्ततेची जबाबदारी येत असल्याने तपासाच्या गतीवर होऊ शकतो.

आता प्रश्न 'गुणोत्तराचा':

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ, गुन्ह्यांची संख्या आणि उपलब्ध पोलिस मनुष्यबळ यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलाची खरी गरज स्पष्ट होणार नाही. त्यामुळे 'एक पोलिस : किती नागरिक?' या प्रश्नाचे जिल्हानिहाय उत्तर शोधून त्यानुसार पोलिस दलाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे.

वरिष्ठ संवर्गही रिकामा:

पोलिस अधीक्षक ते पोलिस महासंचालक संवर्गातील ४५४ मंजूर पदांपैकी ३० पदे रिक्त आहेत. पोलिस उपअधिक्षक संवर्गातील ९७२ मंजूर पदांपैकी १८५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता केवळ तळाच्या स्तरावर नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवर्गातही कायम असल्याचे दिसते.

Maharashtra Police
Dwarka Datta Mandir Road | द्वारका ते दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा; नाशिक महापालिकेची 84 कोटींची मोठी बचत

भरतीला वेग; तरी रिक्त पदे कायम:

राज्य शासनाने २०२५ मध्ये पोलिस व कारागृह विभागातील विविध संवर्गातील १७,६३९ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली होती. यात १२,३९९ पोलिस शिपाई, २३४ पोलिस शिपाई चालक, २५ बँडस्मन, २,३१३ सशस्त्र पोलिस शिपाई आणि ६० कारागृह शिपाई पदांचा समावेश होता. मात्र, भरतीनंतरही निवृत्ती, पदोन्नती आणि इतर कारणांमुळे रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे.


पोलिस दलाची व्यथा:

  • २,२५,४६१ : मंजूर पदे

  • २,०२,१४१ : कार्यरत अधिकारी-कर्मचारी

  • २३,३२० : रिक्त पदे

  • १६,५१६ : रिक्त पोलिस शिपाई

  • २,८७८ : रिक्त पोलिस उपनिरीक्षक

  • १,५६२ : रिक्त सहाय्यक पो. उपनिरीक्षक

  • ५२१ : रिक्त पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news