

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणरायाच्या स्वागताला जिल्ह्यात वरुणराजाने पुन्हा हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शहर व जिल्ह्यात शनिवारी दिवसभर हलक्या ते मध्यम सरी बरसल्यानंतर रविवारी (दि. १३) सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप होती. मात्र, दुपारनंतर पुन्हा हलक्या सरींनी शहरासह जिल्ह्याला चिंब केले.
दरम्यान, रविवारी सकाळी जिल्ह्यात सरासरी ११.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, विशेषतः त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक सुरगाणा व दिंडोरी येथे ३९.१ मिमी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २४.९, पेठमध्ये १५.६, नाशिक तालुक्यात १३.९ आणि बागलाणमध्ये ११.३ मिमी पावसाची नोंद झाली.
मालेगाव, नांदगाव आणि येवला परिसरात पावसाचा जोर ओसरला असून, तिथे एक मिमीहून कमी पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ६३९.९ मिमी पाऊस झाला असून, तो दीर्घकालीन सरासरीच्या ७६.२ टक्के आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांनी सरासरीची पातळी ओलांडली आहे. दिंडोरीत ७०३.२ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल २,३४७.७ मिमी, निफाडमध्ये ४८०.९ मिमी, बागलाणमध्ये ४३९ मिमी आणि कळवणमध्ये ५६५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सरासरीच्या ११७ टक्के, दिंडोरीत ११८.१ टक्के, निफाडमध्ये १२५.७ टक्के, बागलाणमध्ये १०७.८ टक्के, तर कळवणमध्ये १०१.७ टक्के पाऊस झाला आहे.
त्यामुळे या भागातील पिकांना पावसाचा चांगला आधार मिळाला आहे. जिल्ह्याच्या काही भागांत मात्र पावसाची तूट कायम आहे. इगतपुरी सरासरीच्या ४३.३ टक्के, येवल्यात ६०, नांदगावमध्ये ६८.४ आणि मालेगावमध्ये ६८.७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे अद्यापही आकाशाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी ऑरेंज अलर्ट दिल्याने नागरिकांनी खबरदारी घेतली. त्यामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक तुलनेने विरळ दिसून आली.
स्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्ती घरी नेण्याची लगबगत्र्यंबकेश्वर
गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी पावसाचे पुनरागमन झाले आहे. रविवारी (दि. १३) सकाळपासून पाऊस कोसळत असल्याने ग्रामस्थ छत्री घेऊन गणेशमूर्ती घरी घेऊन जाताना दिसत होते. गणेश चतुर्थी आणि हरतालिका एकाच दिवशी आल्यामुळे सकाळी हरतालिका पूजनाची लगबग राहणार व त्यानंतर गणेश स्थापना होईल म्हणून नागरिकांनी रविवारी सायंकाळपर्यंत गणेशमूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत आलेले दिसत होते.
पावसाचा मारा सुरू असल्याने गणेशमूर्ती विक्रेत्यांनी बाप्पाला पारदर्शक प्लास्टिकमध्ये झाकलेले दिसत होते. कुंभमेळापूर्व गणेशमूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्ता (मेन रोड) आदी परिसरात मोठमोठे भव्य पेंडॉल उभारले आहेत. आकर्षक रोषणाईसह भव्य मूर्ती आणि देखावे असे गणपती उत्सवाचे स्वरूप असल्याचे निदर्शनास येत आहे.